प्रसाद रावकर

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणारे डॉक्टर्स, परिचारिका अथवा संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी वावर असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेले पीपीई किट मोठय़ा संख्येने पालिकेला उपलब्ध झाले आहेत. परिणामी, पालिका प्रशासनाने आता नगरसेवक निधीमधून पीपीई किट खरेदी करण्यास मनाई करत ज्या नगरसेवकांकडून किटची मागणी करण्यात येत आहे, त्यांना आपल्याकडील किट देण्यास सुरुवात के ली आहे.

सामाजिक बांधिलकी निधीच्या (सीएसआर) माध्यमातून मुंबई महापालिकेला तब्बल २ लाख ५० हजार पीपीई किट उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी आणखी पीपीई किटच्या खरेदीची आवश्यकता नाही. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने नगरसेवक निधीमधून पीपीई किट खरेदीस मनाई केली आहे. इतकेच नव्हे तर नगरसेवक निधीमधून पीपीई किट खरेदीसाठी दिलेले कार्यादेश तात्काळ रद्द करण्याचे आदेशही प्रशासनाने विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईतील अनेक नगरसेवकांनी पीपीई किट खरेदीसाठी आपला नगरसेवक निधी उपलब्ध करण्याची मागणी के ली होती. त्यांच्याकडून हजारो पीईपी किटची मागणी आहे. पण आता खरेदीचे सर्व कार्यादेश रोखण्यात आले आहेत. तसेच नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार किट उपलब्ध करण्यात आले आहेत. या पीपीई किटचे नगरसेवक वाटप करीत फिरत आहेत.

नगरसेवकांमध्ये नाराजी

आपापल्या प्रभागांमध्ये छोटी-मोठी कामे करण्यासाठी नगरसेवकांना पालिका प्रशासनाकडून नगरसेवक निधी दिला जातो. या निधीचा वापर करून पायवाटा, शौचालयांची दुरुस्ती, लादीकरण अशा प्रकारची कामे नगरसेवक करीत असतात. मात्र करोनाच्या संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर बहुतांश ही कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आदी नगरसेवक निधीतून उपलब्ध करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. अखेर प्रशासनाने करोना निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर आदींची खरेदी नगरसेवक निधीतून करण्याची मुभा दिली. तसेच रुग्णालयासाठी आवश्यक गोष्टी नगरसेवक निधीतून खरेदी करण्यासही परवानगी दिली. मात्र नगरसेवक निधीमधून खरेदी केलेले  मास्क, हातमोजे,  सॅनिटायझरचे मतदारांना वाटप करता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे नगरसेवक नाराज झाले होते.