02 March 2021

News Flash

समाजमाध्यमांमुळे पक्षाघात उपचारयंत्राचा प्रसार

गेली अडीच वर्षे अशा प्रकारच्या उपचारांसाठी महिन्यातून एखाद्या रुग्णाला आणले जात असे.

(संग्रहित छायाचित्र)

शैलजा तिवले

४ महिन्यांत ३० रुग्णांवर वेळेत उपचार; अपंगत्व जीवितहानी टळली

अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरविल्यामुळे समाजमाध्यमे नेहमीच टीकेचे धनी ठरतात. मात्र समाजमाध्यमांमध्ये पसरलेल्या संदेशांमुळे पक्षाघाताच्या ३० रुग्णांना केईएम रुग्णालयात वेळेत उपचार मिळाले. संभाव्य अपंगत्व आणि जीवितहानी टाळली.

केईएममध्ये पक्षाघातावर उपचार करण्यासाठी ‘बायप्लेन डिजिटल सबट्रॅक्शन अ‍ॅन्जिओग्राफी’ यंत्राचा  लोकार्पण सोहळा झाल्याची आणि त्यामुळे पक्षाघाताचे रुग्ण बरे होणार असल्याची चर्चा ऑक्टोबर २०१८च्या पहिल्या आठवडय़ात समाजमाध्यमांमध्ये सुरू झाली. त्यामुळे पक्षाघाताच्या झटक्याने अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक राज्यभरातून केईएम रुग्णालयाकडे धाव घेऊ लागले. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर पहिल्या २४ तासांतच उपचार करणे या यंत्रामुळे शक्य आहे. त्यामुळे ज्यांना हा झटका येऊन बराच काळ झाला आहे, त्यांना आता बरे करणे शक्य नाही, हे नातेवाईकांना समजावताना रुग्णालय प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.

मुळात पक्षाघाताचा झटका आलेल्या रुग्णांवर पहिल्या २४ तासांत उपचार करून त्यांना बरे करणारी यंत्रसामग्री केईएममध्ये गेल्या अडीच वर्षांपासून उपलब्ध आहे. यातील अद्ययावत यंत्र गेल्या वर्षी नव्याने आणले गेले. परंतु समाजमाध्यमांमधून नवी उपचार पद्धती आल्याची बातमी पसरवण्यात आली. या संदेशांमुळे जनजागृती झाली.

गेली अडीच वर्षे अशा प्रकारच्या उपचारांसाठी महिन्यातून एखाद्या रुग्णाला आणले जात असे. मात्र, समाजमाध्यमांत चर्चा झाल्यापासून गेल्या चार महिन्यांत ३० रुग्ण वेळेत उपचारासाठी पोहचले. संभाव्य अपंगत्व किंवा जीवितहानी रोखणे शक्य झाले, असे मज्जातंतू चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

वडाळ्याला राहणारे राजेंद्र पाटील (५४) पेपरचा स्टॉल चालवितात. २५ ऑक्टोबर २०१८ ला त्यांना पक्षाघाताचा झटका आला ‘केईएममधील पक्षाघाताच्या उपचाराबाबत ऐकले होते. माझ्या मित्रांनाही माहीत होते. पक्षाघाताचा झटका आल्याचे समजताच तात्काळ उपचार देण्यासाठी त्या यंत्राचा वापर करण्याचा आग्रह त्यांनी धरला. लगेचच उपचार मिळाले. आता मी पुन्हा पेपरचा स्टॉल चालवतो आहे. अशी माहिती लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे,’ अशी भावना राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली.

केईएमधील अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने अ‍ॅन्जिओग्राफी करून रक्तातील मोठी गुठळी काढता येते, परंतु यासाठी झटका आल्यानंतर २५ तासांत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संभाव्य अपंगत्व किंवा जीवितहानी टाळता येऊ शकते.

– डॉ. संगीता रावत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 12:41 am

Web Title: proliferation of paralysis treatment system through social media
Next Stories
1 फेरीवाल्यांविरोधात ‘कस्तुरपार्क वाचवा’ मोहीम
2 ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने ऑनलाइन खरेदीला रंग
3 कामगार संघटनांमध्ये शीतयुद्ध
Just Now!
X