‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’च्या चर्चासत्रात मान्यवरांचा सूर
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या हस्ते उद्घाटन; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग
नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्सचे एक्सप्रिमेण्टल थिएटर म्हणजे प्रायोगिक नाटकांसाठी अगदी सर्जनशील जागा! या ठिकाणी नाटक करताना अनेक प्रयोग करावे लागतात. मात्र गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या थिएटरमध्ये रंगलेला ‘प्रयोग’ केवळ सर्जनशीलच नाही, तर अत्यंत महत्त्वाचा होता. टीजेएसबी सहकारी बँक प्रस्तुत ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या ‘पायाभूत सुविधां’विषयीच्या सातव्या पर्वाची सुरुवात गुरुवारी झाली. या कार्यक्रमासाठी वाहतूक, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. गुरुवारी सकाळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या हस्ते या सातव्या पर्वाचे उद्घाटन झाले.
त्याचप्रमाणे गेल्या पर्वातील ‘पर्यावरण आणि आपण’ या कार्यक्रमातील चर्चेचा यथासांग आढावा घेणाऱ्या ‘बदलता महाराष्ट्र : पर्यावरण आणि आपण’ या पुस्तकाचे प्रकाशनही संजय भाटिया यांच्या हस्ते झाले. या वेळी टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उतेकर, एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि.चे कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रमुख अरविंद विंझे, इंडियन एक्स्प्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गिस आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी रिजन्सी ग्रुप आणि एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांचे सहप्रायोजकत्व लाभले असून केसरी पॉवर्ड या उपक्रमासाठी एबीपी माझा टेलिव्हिजन पार्टनर आहेत.
शहराचा किंवा एखाद्या प्रदेशाचा विकास व्हायचा असेल, तर पायाभूत सुविधांकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. तसेच या सुविधा पुरवताना काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. त्यात एकमेकांवरील विश्वास, निधी, समन्वय अशा घटकांचा समावेश आहे. ‘लोकसत्ता’ने या उपक्रमाद्वारे एका महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला आहे, असे प्रतिपादन भाटिया यांनी त्यांच्या मनोगतात केले. या मनोगतात त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील आव्हाने आणि त्यांचा सामना करण्यासाठी त्यांनी वापरलेली पद्धत, याचा पायाभूत सुविधांसाठी झालेला फायदा, या गोष्टीही सविस्तर सांगितल्या. ‘नयना’सारखा मोठा प्रकल्प सुरू करताना भूसंपादनासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांची दखल श्रोत्यांनीही घेतली.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दिवसातील पहिल्या सत्राला सुरुवात झाली. ‘पायाभूत सुविधांची सद्य:स्थिती’ या विषयावरील सत्रात वास्तुविशारद अनंत गाडगीळ, वास्तुविशारद नीरा आडारकर आणि मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे संचालक नीरज हातेकर सहभागी झाले. प्राजक्ता कासले यांनी या सत्राच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. या सत्रात प्रामुख्याने मोठय़ा शहरांतील पायाभूत सुविधा, त्यांच्या समस्या आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी यांवर ऊहापोह झाला.
यानंतर झालेल्या जेवणासाठीच्या मध्यंतरातही उपस्थितांमध्ये पहिल्या सत्रातील अनेक मुद्दय़ांवर चर्चा रंगली होती. या सत्रातील तीनही वक्त्यांना गराडा घालून उपस्थित मान्यवर आपापल्या शंकांचे निरसन करत होते. त्यानंतर सचिन रोहेकर यांनी हाताळलेल्या दुसऱ्या सत्रात आयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर, टाटा इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक संजय उबाळे आणि बिर्ला समूहाचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अजित रानडे या वक्त्यांनी ‘पायाभूत सुविधांसाठी निधीचे आव्हान’ या विषयावर आपली मते मांडली. तर ‘शासकीय यंत्रणांची भूमिका’ या विषयावरील तिसऱ्या सत्रात पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त महेश झगडे, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैयस्वाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या सत्राचे सूत्रसंचालन मधू कांबळे यांनी केले. या तीनही सत्रांच्या अखेरीस उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या मनातील प्रश्न थेट वक्त्यांना विचारले. या अभ्यासपूर्ण प्रश्नांमुळे आणि वक्त्यांनी दिलेल्या तेवढय़ाच अभ्यासपूर्ण उत्तरांमुळे दोन दिवसीय चर्चासत्रातील पहिला दिवस अत्यंत चित्तवेधक ठरला.