माटुंग्यातील शाळेत समर्थनात कार्यक्रम; शिक्षणमंत्र्यांची नाराजी

सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध आणि समर्थन यावरून देशातील वातावरण ढवळून निघाले असताना माटुंग्यातील एका शाळेने विद्यार्थ्यांसाठी सीएएचे महत्त्व विशद करणारा कार्यक्रम घेतला. श्री दयानंद बालक बालिका विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील पाचवी ते दहावी इयत्तेत शिकणारे एक हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अशा प्रकारचा कार्यक्रम कांदिवली येथील श्री दयानंद विद्यालयातही १३ जानेवारीला होणार आहे. ऐरोलीतील आर्य गुरुकुल ज्युनिअर कॉलेज आणि मुलुंड व सायन परिसरातील शाळांमध्येही कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी सीएए कायद्याबाबत त्यांची मते पंतप्रधान मोदींना पाठवावीत यासाठी त्यांना पोस्ट कार्डचे वाटप केले आहे.

सीएए आणि एनआरसी याच्यावरून देशभरात  विरोध होत आहे. त्यामुळे भाजपने या कायद्याचे समर्थन करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासाठी भाजपचे पदाधिकारी विद्यार्थ्यांमध्ये कायद्याचा प्रचार प्रसार करत आहेत. या कार्यक्रमासाठी श्री दयानंद बालक बालिका विद्यालयातील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा दोन तास पुढे ढकलण्यात आल्या अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. याबाबत शाळेच्या प्राचार्या संगीता सिंग यांना विचारणा केली असता परीक्षा नियोजित वेळेत पार पडल्याचे त्यांनी सांगितले. या कायद्याबाबत माहिती देण्यासाठी शाळेने भाजपचे पदाधिकारी राजेंद्र शिरवाडकर, नगरसेविका नेहल शहा आणि शाळेच्या ट्रस्टी व भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या महामंत्री सुमितासुमन सिंग यांना पाचारण केले. याबाबत सुमितासुमन सिंग यांच्याकडे विचारणा केली असता, मुलांच्या मनात कायद्याबाबत प्रश्न होते, त्यांना त्याबाबत माहिती मिळावी, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. आणखी काही शाळांमध्ये जाऊन कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून शाळांमध्ये राजकारण करणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. सीएएचा विरोध करणाऱ्यांनाही विद्यार्थ्यांसमोर त्यांची मते मांडू देणार का अशी विचारणा करताच त्यांनी त्यास नकार दिला.

संबंधित प्रतिनिधीने विद्यार्थ्यांशी याबाबत संवाद साधला असता, हा कायदा भारतासाठी फायदेशीर असल्याचे उत्तर त्यांनी दिले. मात्र कायद्यामध्ये नक्की काय आहे, अशी विचारणा करताच त्यांना त्याबाबत माहिती नव्हते. या कायद्यामुळे देशातील घुसखोर बाहेर जाणार एवढेच ते सांगत होते. ‘घरात आलेले पाहुणे आपण किती दिवस ठेऊन घेणार, त्यांना माघारी पाठविले पाहिजे’ असे हे विद्यार्थी सांगत होते. यावरून विद्यार्थ्यांना कायद्याबाबत कितपत समजले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.

कार्यक्रमाबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता सिंग यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सीएएबाबत जनजागृती करण्यासाठी तज्ज्ञांचा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. ‘या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शंका विचारल्या. शाळेतील शिक्षकांनी शंका दूर केल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितले. मात्र जेएनयूमधील शिक्षकांकडून त्या विद्यार्थ्यांच्या शंका का दूर केल्या जात नाहीत,’ असा प्रश्नही मुलांनी तज्ज्ञांना विचारला अशी माहिती सिंग यांनी दिली.

शाळांमध्ये शिक्षणासंबंधी उपक्रम व्हावेत. राजकारणासाठी इतर व्यासपीठे आहेत. सीएएच्या मुद्दय़ाशी लहान मुलांचा काय संबंध आहे. शाळांमध्ये अशा पद्धतीचे राजकीय कार्यक्रम घेतलेले चालणार नाहीत. माटुंग्यातील शाळेत झालेल्या कार्यक्रमाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर शाळेवर कारवाई केली जाईल.

– वर्षां गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

आदित्य ठाकरे यांची शाळांच्या राजकीयीकरणावर टीका

मुंबई : माटुंगा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या कार्यक्रमावरून राजकारण तापले आहे. अशाप्रकारे शाळांमध्ये जाऊन कायद्याबाबत प्रचार करणे हास्यास्पद असून शाळांचे राजकीयीकरण सहन करता कामा नये, अशी टीका पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

या कार्यक्रमामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता तर मग अशाप्रकारे प्रचार करण्याची गरजच काय होती. शाळांचे राजकीयीकरण सहन करता कामा नये, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून  केली आहे. राजकारण्यांना शाळेत जाऊन बोलायचेच असेल तर स्वच्छता, हेल्मेट, स्त्री-पुरुष समानता या विषयांवर बोलावे, असा सल्लाही आदित्य यांनी दिला. तर शाळेमध्ये असे कार्यक्रम घेणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर व अशा कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

आरोप फेटाळले

याबाबत भाजपच्या सुमिता सुमन सिंह यांच्याकडे विचारणा केली असता, शाळांमध्ये जाऊन राजकारण केलेले नाही. देशाच्या एका कायद्यावर चर्चा केली. मुलांची मते जाणून घेतली, असे सांगत शिवसेना-काँग्रेसचे आक्षेप सुमिता सिंह यांनी फेटाळून लावले.