ठाणे महापालिकेचा कारभार बिल्डराभिमुख असल्याची चर्चा असतानाच ठाण्यात एमसीएचआय या संस्थेमार्फत भरविण्यात आलेल्या मालमत्ता प्रदर्शनास महापालिकेची परवानगीच नसल्याची बाब गुरूवारच्या सर्वसाधारण सभेत उघडकीस आली असून या प्रकरणी संबंधित संस्थेविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याऐवजी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेची बिल्डरांवरील ‘असीम’ माया पुन्हा एकदा दिसून आली आहे.
ठाणे येथील एमसीएचआय या संस्थेमार्फत दरवर्षी मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात येते. यंदा फेब्रुवारी महिन्यात अशाच प्रकारचे प्रदर्शन घोडबंदर भागात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या हस्ते झाले होते. या प्रदर्शनात अधिकृत मालमत्तेविषयी माहीती देण्यासाठी महापालिकेमार्फत स्टॉल लावण्यात आला होता.
या प्रदर्शनाच्या जागेसाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली होती का, असा प्रश्न काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी गुरूवारी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. खासगी जागेत तात्पुरते बांधकाम किंवा मंडप उभारण्यासाठी परवानगी घेणे गरजेचे आहे, असे सांगत या प्रदर्शनासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती, अशी कबुली महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी यावेळी दिली. तसेच त्याविषयी आपणास काहीच माहित नव्हते. पण, शहरातील नागरिकांना अधिकृत घरांविषयी माहिती मिळावी, यासाठी प्रदर्शनात महापालिकेचा स्टॉल लावण्यात आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, याप्रकरणी सर्वसामान्यांप्रमाणेच या संस्थेवर आणि शहर विकास विभागावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. त्यावर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि पुढच्या वर्षीपासून परवानगी घेण्याची समज त्यांना देण्यात येईल, असेही आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केले.