निश्चलनीकरणानंतरच्या ‘स्वस्ताई’ची शक्यता धूसर

गेले काही महिने बांधकाम व्यवसायात अघोषित मंदी आलेली असतानाच निश्चलनीकरणामुळे घरांच्या किमती आणखी कमी होतील, अशी शक्यता वर्तविली जात असली तरी घरांच्या किमती आणखी घसरणार नाहीत, असे मत या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. केंद्रीय रिएल इस्टेट कायदा अस्तित्वात येण्याआधीपासूनच अनेक बडे बांधकाम व्यावसायिक संपूर्ण धनादेशाद्वारे रक्कम घेत असल्यामुळे छोटे गृहप्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांतील घरांच्या किमतींत फारसा फरक पडणार नाही, असेही जाणकारांचे मत आहे.

विविध कारणांमुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये घरांची निर्मितीही थंडावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खासगी विकासकांची परवडणारी घरे वगळता इतर अतिउच्च वा उच्च, मध्यम गटासाठी असलेल्या घरनिर्मितीने फारसा वेग पकडलेला नाही. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत तब्बल ८० हजारांहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. तरीही घरांच्या किमती घसरल्या नव्हत्या. आता निश्चलनीकरणानंतर घरांच्या किमतींमध्ये घसरण होईल, असा अंदाज बांधला जात असला तरी या क्षेत्रातील घडामोडींवर बारीक नजर ठेवून असणाऱ्या जोन्स लँग लासेले या कंपनीने तो फेटाळून लावला आहे. एक ते तीन इमारती बांधणाऱ्या छोटय़ा विकासकांना या निश्चलनीकरणाचा फटका बसेल, परंतु मध्यम ते उच्च व अतिउच्च वर्गासाठी घरे बांधणाऱ्या विकासकांना फारसा फटका बसणार नाही, असे या कंपनीचे संशोधन विभागाचे प्रमुख आशुतोष लिमये यांनी स्पष्ट केले.

बांधकाम व्यवसायात आतापर्यंत ६०:४० प्रमाण प्रसिद्ध होते. (६० टक्के धनादेशाद्वारे आणि ४० टक्के काळा पैसा) गेल्या काही वर्षांत शीघ्रगणकाचे दर वाढल्यामुळे काळ्या पैशाचे प्रमाण ३० ते २० टक्क्य़ांपर्यंत घसरले होते. प्रामुख्याने छोटय़ा विकासकांकडून असे व्यवहार अद्याप सुरू होते; परंतु निश्चलनीकरणानंतर त्याला आळा बसणार आहे. त्यामुळे या ठिकाणी घरांच्या किमती काही प्रमाणात खाली येऊ शकतात; परंतु अशा ठिकाणी व्यवहारही धोकादायक ठरू शकतो, याकडे लिमये यांनी लक्ष वेधले. मध्यम ते उच्च व अतिउच्च वर्गासाठी असलेल्या बहुसंख्य गृहप्रकल्पात सध्या काळा पैसा स्वीकारण्याचे प्रमाण संपुष्टात आले आहे. संपूर्ण रक्कम धनादेशाद्वारे घेण्याची पद्धत वापरली जात आहे. ९० टक्के कर्ज आणि उर्वरित दहा टक्के धनादेशाद्वारे घेऊन सदनिका आरक्षित केल्या जात आहेत. खुल्या बाजारापेक्षा बँकेने उपलब्ध करून दिलेले कर्ज घरखरेदीदारांना  परवडत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

untitled-24