05 August 2020

News Flash

मालमत्ता कर भरण्याबाबत पालिकेची दवंडी

जकात बंद झाल्यानंतर पालिकेचा सर्वात मोठा महसुलाचा स्रोत असलेल्या मालमत्ता करावरच पालिकेची सगळी भिस्त आहे.

संग्रहित छायाचित्र

 

करवसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी नवी मोहीम

मुंबई : पालिकेचा महत्त्वाचा महसुलाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली वाढवण्यासाठी पालिकेने आता शक्कल लढवली आहे. रस्त्यांवरून दवंडी पिटल्याप्रमाणे ध्वनिक्षेपकावरून मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या वर्षी पालिकेच्या करनिर्धारण विभागाची वसुली चांगलीच घटल्यामुळे पालिकेला अक्षरश: रस्त्यावर उतरावे लागले आहे. आर्थिक वर्ष संपत आले तरी केवळ ३००० कोटींची वसुली झालेली असल्यामुळे पालिकेने आता मालमत्तांना नोटिसा धाडणे, जप्ती, पाणी तोडणे अशा कारवाया सुरू केल्या आहेत.

जकात बंद झाल्यानंतर पालिकेचा सर्वात मोठा महसुलाचा स्रोत असलेल्या मालमत्ता करावरच पालिकेची सगळी भिस्त आहे. मात्र मालमत्ता कराची वसुलीही चांगलीच रोडावली आहे. अनेक कंपन्यांनी मालमत्ता कर थकवले असून त्याच्या थकबाकीची प्रकरणे प्रलंबित आहेत. या वर्षी मालमत्ता करवसुलीसाठी ५१०० कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ ३००० कोटींचीच वसुली अद्याप झाली आहे. २००० कोटींची तूट करनिर्धारण विभागाला महिन्याभरात भरून काढावी लागणार आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी संस्थांनी थकवलेल्या मालमत्ता कराची संचित थकबाकी १५००० कोटींवर गेल्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे हा विभाग आता युद्धपातळीवर कामाला लागला आहे. मालमत्ता करमाफीच्या घोळामुळे निवासी सदनिकांची अडकलेली देयकेही आता धाडली आहेत. तसेच कर थकवणाऱ्या थकबाकीदारांविरोधात नोटिसा धाडणे, जप्तीची कारवाई करणे आदी कारवाई सुरू केली आहे. त्यातच आता या विभागाने रस्त्यावर फिरत ध्वनिक्षेपकावरून मालमत्ता कर भरण्यासंदर्भात आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.

पालिकेच्या एच पूर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी बांद्रा, खार परिसरात अशी जनजागृती केली. मालमत्ता कर वेळेत भरला नाही तर मालमत्ता जप्त करणे, मालमत्तेची विक्री करणे किंवा पाणीपुरवठा खंडित करणे अशी कारवाई केली जाईल, असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून करण्यात येत होते. विशेषत: व्यापारी स्वरूपाच्या मालमत्तांच्या जवळ जाऊन वाजतगाजत, ध्वनिक्षेपकावरून याबाबत आवाहन करण्यात आले.

मालमत्ता कराचे लक्ष्य ५१०० कोटींचे असून त्यापैकी केवळ ३०८७ कोटींची वसुली अद्याप झाली आहे. मोठय़ा १०० थकबाकीदारांची यादी आम्ही जाहीर केली आहे. मोठय़ा १० थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे.

संगीता हसनाळे, साहाय्यक आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 12:53 am

Web Title: property tax bmc new campaign akp 94
Next Stories
1 सरकारी इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी अशक्य
2 न्यायमूर्ती रणजित मोरे यांची मेघालय उच्च न्यायालयात बदलीची शिफारस
3 वुहानवरून आलेले ३६ महाराष्ट्रीय परतले
Just Now!
X