22 November 2019

News Flash

मंत्र्यांच्या बंगल्यांचा मालमत्ता कर जमा

सार्वजनिक बांधकाम विभागाने २.४० कोटी रुपयांची थकबाकी भरली

(संग्रहित छायाचित्र)

मलबार हिल येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानासह मंत्र्यांचे बंगले, आमदार निवास आणि शासकीय इमारतींचा थकलेला मालमत्ता कर सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी पालिकेच्या तिजोरीत जमा केला. सुमारे २ कोटी ४० लाख रुपये ‘एनईएफटी’द्वारे पालिकेकडे भरण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

‘लोकसत्ता, मुंबई’त २६ जून रोजी ‘वर्षां बंगल्याचा मालमत्ता करही पाच वर्षांपासून थकीत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. गेल्या पाच वर्षांमध्ये ‘वर्षां’ बंगल्याचा ७ लाख ३ हजार १४६ रुपये मालमत्ता कर थकल्याचे या वृत्ताच्या माध्यमातून उजेडात आले. हे वृत्त प्रसिद्ध होताच बुधवारी सकाळीच पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘डी’ विभाग कार्यालयात धाव घेत ‘वर्षां’ बंगल्याच्या थकीत मालमत्ता कराची माहिती करून घेतली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचीही धावपळ उडाली. ‘वर्षां’सह मंत्र्यांचे बंगले, आमदार निवास आणि अन्य शासकीय इमारतींचा किती मालमत्ता कर थकला आहे याचा आढावा घेण्यात आला. तब्बल २ कोटी ४० लाख रुपये मालमत्ता कर थकल्याचे लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारीच ‘एनईएफटी’द्वारे ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत भरून टाकली.

‘वर्षां’ निवासस्थानाच्या क्षेत्रफळानुसार वर्षांकाठी मालमत्ता करापोटी राज्य सरकारकडून पालिकेच्या तिजोरीत एक लाख ६३ हजार १४४ रुपये जमा करणे क्रमप्राप्त आहे. २०१४ पासून २०१८ पर्यंतच्या काळातील मालमत्ता करापोटी ७ लाख ३ हजार १४६ रुपये थकले होते. त्याशिवाय चालू वर्षांतील कर भरणा झालेला नव्हता.

First Published on June 27, 2019 1:42 am

Web Title: property tax deposits for the varsha bungalow abn 97
Just Now!
X