News Flash

मुंबईकरांना मालमत्ताकराची स्वतंत्र देयके

मालमत्ता नियोजित वेळेत भरून त्या बदल्यात मिळणारी सवलत पदरात पाडून घेण्याची संधीही रहिवाशांना मिळणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भोगवटाधारक इमारतींसाठी पालिकेचा निर्णय; इमारतीमधील सामायिक जागेचा कर सोसायटीच्या नावे

मुंबईमधील १ एप्रिल २०१८ पासून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेल्या सर्वच इमारतींमधील सदनिकाधारकांना स्वतंत्रपणे वैयक्तिक मालमत्ता कराची देयके देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे आता रहिवाशांना मालमत्ता कर भरण्यासाठी आता सोसायटीवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. त्याचबरोबर मालमत्ता नियोजित वेळेत भरून त्या बदल्यात मिळणारी सवलत पदरात पाडून घेण्याची संधीही रहिवाशांना मिळणार आहे. त्याचबरोबर नव्या इमारतीमधील विकल्या न गेलेल्या सदनिका अथवा गाळ्यांवरील मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी विकासकावर सोपविण्यात आली आहे.

मुंबईमधील इमारती आणि रहिवाशांना पुरविण्यात येणाऱ्या नागरी सुविधांपोटी पालिकेकडून मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. इमारती अथवा संबंधित सोसायटीवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. अनेक वेळा रहिवाशी मालमत्ता कराची रक्कम सोसायटीकडे जमा करतात. परंतु सोसायटीकडून मालमत्ता कराची एकत्रित रक्कम पालिकेला अदा करण्यास विलंब होतो आणि मग वेळेत न भरलेल्या मालमत्ता करावर दंड आकारणी करण्यात येते. त्यामुळे रहिवाशांना भरुदड सहन करावा लागतो. रहिवाशांची या त्रासातून सुटका करण्यासाठी, तसेच मोठय़ा प्रमाणावर मालमत्ता कराची वसुली व्हावी यासाठी पालिकेने आता मुंबईत उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारतींमधील रहिवाशांना मालमत्ता कराची वैयक्तिक देयके देण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०१८ पासून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होणाऱ्या इमारतीमधील सदनिकाधारकांना मालमत्ता कराची वैयक्तिक देयके देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. इमारतीमधील सामायिक जागेसाठीच्या मालमत्ता कराचे देयक मात्र, सोसायटीच्या नावे देण्यात येणार आहे. सोसायटी स्थापन झाली नसल्यास हे देयक विकासकाच्या नावाने देण्यात येईल, असे मुखर्जी यांनी सांगितले.

कर भरण्याची प्रक्रिया

  • मालमत्ता कराच्या रकमेची व थकबाकीची माहिती ६६६.ेूॠे.ॠ५.्रल्ल (स्र्१३ं’.ेूॠे.ॠ५.्रल्ल) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर डाव्या बाजूला ‘जलद दुवे’ या लिंकअंतर्गत ‘मालमत्ता कर (नवीन)’ या लिंकवर ‘यूआयडी’नुसार सदर माहिती उपलब्ध आहे.
  • संबंधित सदनिकाधारक वा गाळेधारकांनी आपल्या मालमत्तेचा १५ आकडी यूआयडी क्रमांक नमूद केल्यावर, त्यांच्या मालमत्ता कराची देय रक्कम दिसेल. याबाबत ‘ऑनलाइन पेमेंट’ची सुविधादेखील उपलब्ध आहे.

सवलत अशी मिळणार

नव्या इमारतींमधील प्रत्येक सदनिकेचे वा गाळ्याचे देयक स्वतंत्रपणे उपलब्ध होणार असून संबंधितांना त्यांचे देयक ऑनलाइन पद्धतीने तात्काळ भरणे शक्य होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळेपूर्वी देयकाची रक्कम भरणाऱ्यांना पालिकेकडून जाहीर करण्यात आलेला सवलतीचा लाभ मिळणार आहे. मालमत्ता करधारक ३० जूनपूर्वी पूर्ण वर्षांचा मालमत्ता कर भरतील त्यांना पहिल्या ६ महिन्यांच्या देयकावर दोन टक्के, तर दुसऱ्या ६ महिन्यांच्या देयकावर चार टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

जबाबदारी विकासकाची

नव्या इमारतींमधील विकल्या न गेलेल्या सदनिका अथवा गाळ्यांवरील मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी संबंधित विकासकावर निश्चित करण्यात आली आहे. यावरून विकासक आणि सोसायटीमध्ये वारंवार वाद उद्भवत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 4:53 am

Web Title: property tax payments bmc
Next Stories
1 शिवसेनेत ‘तुही यत्ता कंची’चा वाद
2 सागरी किनारा रस्त्यास विलंब
3 बेस्टच्या ४११ वाहनांसाठी वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नाही
Just Now!
X