परिवहन विभागाच्या सुमार कामगिरीमुळे तोटय़ात चाललेल्या बेस्ट उपक्रमाला धुगधुगी देण्यासाठी तिकीट दरवाढीचा पर्यायही अवलंबून झाल्यावर आता बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांच्या खिशाला खड्डा पाडण्यासाठी नवीन प्रस्ताव मांडला आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता करावर आता परिवहन अधिभार लावून ती रक्कम बेस्टला देण्याच्या या प्रस्तावाला बेस्ट समितीत मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार हा परिवहन अधिभार एकूण मालमत्ता कराच्या १० टक्क्यांपर्यंत असेल.  या प्रस्तावाला काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्या सदस्यांनी विरोध करत सभात्याग केला. मात्र त्याचा कोणताही परिणाम होऊ न देता या अधिभारावर शिक्कामोर्तब झाले. आता हा प्रस्ताव आधी मुंबई महापालिकेकडे आणि त्यानंतर राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर एप्रिल २०१६पासून हा परिवहन अधिभार लागू होणार आहे.
वर्षपूर्तीनिमित्त महागाईच्या झळा..
हा अधिभार म्हणजे बेस्टच्या परिवहन सेवेशी संबंध नसलेल्या आणि असलेल्याही सर्वसामान्य मुंबईकरांची लूट असल्याचा आरोप काँग्रेसचे सदस्य रवी राजा आणि शिवजी सिंह यांनी केला. बेस्टशी संबंध नसलेल्या लोकांनी परिवहन विभागाचा तोटा का भरून काढावा, असा प्रश्न राजा यांनी उपस्थित केला. तर बेस्टचे प्रवासी तिकीट काढून प्रवास करतात. त्यांच्याकडून अधिक अधिभार का घ्यावा, असे सिंह यांनी विचारले. मात्र सत्ताधारी शिवसेना-भाजप सदस्यांनी हा प्रस्ताव ५० लाख मुंबईकरांच्या हिताचा असून त्यामुळे बेस्ट उपक्रम टिकणार असल्याची भूमिका घेतली. त्यानंतर विरोधी पक्षातील सदस्यांनी सभात्याग केला व हा प्रस्ताव मतदानाला आल्यावर तो मंजूर झाला.
*बेस्टच्या परिवहन विभागाला होणारा आर्थिक तोटा सध्या विद्युत विभागातून भरून काढण्याची प्रथा आहे. त्यासाठी वीजग्राहकांना बिलांमध्ये परिवहन अधिभार (टीडीएलआर) भरावा लागतो.
*हा अधिभार १.५४ पैसे प्रतियुनिट एवढा आहे. मात्र एमईआरसीने दिलेल्या निर्देशांनुसार पुढील आर्थिक वर्षांपासून हा टीडीएलआर घेणे बंद होणार आहे.
*टीडीएलआरमधून बेस्टला सध्या वर्षांला ४०० ते ४५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. हे उत्पन्न पुढील आर्थिक वर्षांपासून बंद होणार आहे.
*मुंबईकरांच्या खिशातूनच हा खड्डा भरून काढण्याचा प्रस्ताव समितीच्या बैठकीत मांडण्यात आला.
*या प्रस्तावानुसार मुंबई महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना त्यांच्या मालमत्ता करावर परिवहन अधिभार भरावा लागणार आहे. हा अधिभार मालमत्ता कराच्या १० टक्क्यांपर्यंत असेल.
*सध्या महापालिकेकडे मालमत्ता करापोटी साडेचार ते पाच हजार कोटी एवढे उत्पन्न जमा होते.
*या मालमत्ता करावर १० टक्क्यांपर्यंत परिवहन अधिभार लावल्यास बेस्टच्या तिजोरीत ४५० कोटींर्पयची रक्कम जमा होणार आहे.