प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनलेल्या मालमत्ता कराची देयके २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील सहा महिने लोटले तरीही मुंबईकरांना वितरित करता आलेली नाहीत. परिणामी मालमत्ता करवसुली अडली असून करोनाविषयक कामांचा वाढलेला खर्च आणि महसूल वसुलीला लागलेली उतरंड यामुळे कारभाराचा गाडा पुढे हाकताना पालिकेने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

जकात कर आणि मालमत्ता कर हे मुंबई महापालिकेच्या उत्पन्नााचे मुख्य स्रोत मानले जात होते. मात्र देशभरात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला जकात कर बंद करण्यात आला. मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालमत्ता कराच्या वसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले. करोनामुळे लागू झालेली टाळेबंदी, करोना कामासाठी जुंपण्यात आलेले करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचारी, मुंबईकरांच्या रोजगारावर झालेला परिणाम आदी विविध कारणांमुळे चालू आर्थिक वर्षांत (२०२०-२१) मालमत्ता कराची हवी तेवढी वसुली होऊ शकलेली नाही. त्यातच चालू आर्थिक वर्षांतील मालमत्ता कराची देयके उपलब्ध होऊ न शकल्याने वसुलीत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सत्ताधारी शिवसेनेने पालिका निवडणुकीच्या प्रचारात ५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिकेत राहणाऱ्यांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार करमाफी करण्यात आली. मालमत्ता कराच्या देयकामध्ये निरनिराळ्या ११ करांचा समावेश आहे. यापैकी केवळ सर्वसाधारण कर माफ करून देयके जारी करण्यात आली होती. त्यावरून गोंधळ उडाला. परिणामी, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकाधारकांकडून मालमत्ता करवसुली करण्यात आली नाही. या गोंधळाचे घोंगडे आजही भिजत पडले आहे. त्यामुळे एक लाख ८५ करदात्यांकडून ३४० कोटी रुपये कर पालिकेला वसूल करता आलेला नाही. मोठी घरे असलेल्या सदनिकाधारकांची संख्या पाच ते सव्वापाच लाखांच्या आसपास असून देयके जारी न झाल्यामुळे या करदात्यांकडून ५५०० कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करता आलेला नाही.

पालिके ला निधीची गरज

करोना संसर्गामुळे पालिके ला मोठा निधी खर्च करावा लागला आहे. पालिके ने सागरी किनारा मार्गासह काही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातच नागरी कामांवर पालिके ला मोठा खर्च येत आहे. एकू णच आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी पालिके ने निधीची गरज आहे. त्यामुळे करवसुलीतून महसूल वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे.

करसवलतीचे काय?

संपूर्ण वर्षांची कराची रक्कम जूनपर्यंत पालिकेच्या तिजोरीत जमा करणाऱ्या करदात्याला ४ टक्के   सवलत देण्यात येते. जुलै अखेपर्यंत कराची पूर्ण रक्कम भरणाऱ्याला २ टक्के  सवलत देण्यात येते. पण यंदा मुंबईकरांना चालू वर्षांची देयकेच मिळालेली नाहीत. त्यामुळे आता एकरकमी कर भरणा केल्यानंतर ही सवलत मिळणार की नाही, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.