मुंबई : टाळेबंदीमुळे शिक्षण खंडित झालेल्या देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी ग्रेस फाउंडेशनच्या माध्यमातून ५ टॅब देण्यात आले आहेत. या माध्यमातून कामाठीपुरात देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सुमारे १५ मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत टाळेबंदीपासून शाळा आणि वसतिगृहे बंद आहेत. या वसतिगृहात राहून ज्ञानार्जन करणारी देहविक्री करणाऱ्या महिलांची मुलेही आईजवळ घरी परतली आहेत. टाळेबंदीत शाळेत प्रत्यक्ष शिकवणी वर्ग भरत नसले तरी ऑनलाइन शिक्षण मात्र सुरू झाले आहे. टाळेबंदीमुळे रोजगार बुडाल्याने या महिलांच्या हलाखीत आधीच वाढ झाली. त्यात मागील सहा महिन्यात उदरनिर्वाह चालविण्यासाठी या महिलांना उसनवारीने पैसे घ्यावे लागत आहेत. तसेच घर भाड्याचा मोठा भार त्यांच्या डोक्यावर वाढला आहे. या परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणासाठी अँड्राईड भ्रमणध्वनी  अथवा संगणक घेण्याची ऐपत या महिलांची नाही. त्यामुळे शिक्षण सुरू झाले तरी बहुतांश मुले त्यापासून वंचित होती.

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ग्रेस फाउंडेशनच्या माध्यमातून शंकर मुगलखोड यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्यातून कम्युनिटी ऑफ होपचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. विली सोन्स यांनी ५ टॅब मोफत दिले असून त्यामुळे या मुलांचे शिक्षण सुरू झाले आहे.

ऑनलाइन शिकवणी वर्गांसाठी इंटरनेटची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. कामाठीपुरातील या महिलांच्या वस्तीतच एका छोट्या जागेत ताडपत्रीच्या साहाय्याने उभारलेल्या खोलीत या मुलांची ऑनलाइन शाळा भरते. तासिकेच्या वेळी ही मुले या ठिकाणी येऊन ऑनलाइन शिक्षण घेतात, अशी माहिती शंकर यांनी दिली. तसेच येथे विद्याथ्र्यांसाठी पुस्तकांची व्यवस्थाही संस्थेच्या माध्यमातून केली गेली आहे. आणखीही मुलांच्या शिक्षणासाठी टॅब अथवा पुस्तकांच्या स्वरूपात दानशूरांनी मदत करावी, असे आवाहन ग्रेस फाउंडेशनचे शंकर मुगलखोड यांनी केले आहे.