चटईक्षेत्र निर्देशांकाची करण्यात आलेली खैरात, खारफुटीतून गेलेले रस्ते, मसुद्यातून गायब झालेल्या पुरातन वास्तू आदी विविध कारणांमुळे पालिकेने आगामी २० वर्षांसाठी तयार केलेल्या विकास आराखडय़ाच्या मसुद्याला विरोध दर्शविण्यासाठी शनिवारी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत फेरीवाले, कोळीवाडय़ांतील रहिवासी, झोपडपट्टीवासी सहभागी होणार आहेत.
मुंबईचा २०१४-३४ या २० वर्षांच्या कालावधीतील विकास आराखडय़ाचा मसुदा प्रशासनाने महापौरांना सादर केल्यानंतर तो सर्वासाठी उपलब्ध करण्यात आला होता.
 या आराखडय़ात विविध भागांमध्ये करण्यात आलेल्या चटईक्षेत्र निर्देशांकाच्या खैरातीवरून तो विकासकांसाठी तयार करण्यात आल्याची टीका सामाजिक संस्थांकडून करण्यात येत होती. त्याचबरोबर मुंबईतील असंख्य पुरातन वास्तू, झोपडपट्टय़ा, खारफुटी आदी विकास आराखडय़ातून गायब झाली होती. कोळीवाडे सुरक्षित ठेवावेत, झोपडपट्टय़ांचे सर्वेक्षण योग्य पद्धतीने करावे, झोपडपट्टय़ांतून जाणारे रस्ते वळवावेत, फेरीवाल्यांसाठी २.५ टक्के जागा आरक्षित ठेवावी, आदी विविध मागण्यांसाठी शनिवारी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे.