विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळल्यावर आता राज्यातील सत्ताधारी पक्षांशी निगडित विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा सूर आळवला आहे. परीक्षा देणे धोकादायक वाटणाऱ्या या संघटनांना आंदोलनासाठी अंतर नियमांचा भंग करण्यात मात्र काही वावगे किंवा धोकादायक वाटत नसल्याचे दिसत आहे.

विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करून निर्णयाचे श्रेय घेण्याच्या अहमहमिकेत गुंतलेल्या विद्यार्थी संघटनांना यूजीसीच्या निर्णयाचा धक्का बसला. परीक्षा घेण्याची सूचना दिल्लीस्थित केंद्रीय मंडळाने केल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी राज्यात आंदोलन करण्याचे इशारे देण्यास सुरुवात केली आहे. ‘परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे,’ असे म्हणणाऱ्या संघटना आंदोलने करताना सामाजिक अंतराचे निकष पाळणे, मुखपट्टय़ा वापरणे अशी प्राथमिक काळजीही घेत नसल्याचे दिसत आहे. मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून यूजीसीच्या निर्णयाच्या प्रती फाडल्या. जमलेले कार्यकर्ते बिनदिक्कत दाटीवाटीने उभे होते. अनेकांच्या मुखपट्टय़ा या नाक आणि तोंडावर असण्याऐवजी गळ्यात अडकवलेल्या दिसत होत्या. अगदी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतानाही काही कार्यकर्त्यांनी मुखपट्टी वापरली नाही. मात्र, परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना करोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

विद्यार्थी भारती या संघटनेच्या अध्यक्षांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ‘परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य आणि जीव गमवावा लागणार आहे,’ असा आरोप संघटनेने केला आहे.

स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, दक्षिण महाराष्ट्र या संघटनेने ‘यूजीसीचा निर्णय चुकीचा असून त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढेल आणि पुढील शैक्षणिक वर्षांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल,’ असे मत व्यक्त केले आहे.