उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक

सरकारमध्ये असल्याने सरकारविरोधात आंदोलन करायचे नाही, असे कोणीही सांगितलेले नाही. जनतेची कामे होत नसतील तर सरकारचे कान उपटले पाहिजेत, असे सांगत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काम करावे, त्यासाठी गरज पडल्यास आक्रमक व्हावे, आंदोलन करावे, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

पुणे, खान्देशातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक व बुलढाणा, वाशिम, खामगाव भागातील नेते-कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम सोमवारी शिवसेना भवनावर पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. शिवसेना राज्य व केंद्र सरकारमध्ये सामील असल्याने शिवसैनिकांनी आंदोलन करायचे नाही असे काही नाही. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सरकारमध्ये असतानाही सरकारची कानउघाडणी केली होती, याची आठवणही उद्धव यांनी करून दिली.

नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी काम करावे. केंद्र, राज्य सरकार विविध योजना जाहीर करतात. लाभार्थीच्या जाहिराती देतात. त्यामुळे आपल्या गावातील, तालुक्यातील किती लोकांना याचा लाभ मिळाला आहे, हे पाहिले पाहिजे. केवळ पाठपुराव्याने काम होत नसेल तर शिवसैनिकांनी आक्रमक व्हावे,  असेही ठाकरे म्हणाले.