‘आरे वाचवा, मुंबई वाचवा’ अशा घोषणा देत आरे वसाहतीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला पर्यावरणप्रेमींनी रविवारी तीव्र विरोध केला.

आरे संवर्धन समितीच्यावतीने मेट्रो कारशेडला विरोध दर्शविण्यासाठी आरे वसाहतीतील बिरसा मुंडा चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात समता युवा मंच, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष यांच्यासह पर्यावरणप्रेमी तरुण-तरुणी मोठय़ा संख्येने सामील झाले होते.

‘मुंबई मेट्रो-३’साठी आरे वसाहतीत कारशेड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार ७०० वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. त्याला  नागरिकांचा विरोधा आहे. शहराला स्वच्छ आणि शुद्ध हवा देण्यासाठी आता आरे वसाहतीत  जंगलच शिल्लक राहिले असून त्यातील झाडे नष्ट केली, तर मुंबईचा शुद्ध हवेचा स्रोतच नाहीसा होईल, अशी भीती व्यक्त करीत पर्यावरणप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याला प्रतिसाद देत महाविद्यालयीन तरुण-तरुणीही या आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

मेट्रो कारशेड अन्यत्र हलवावी, अशी मागणी रोहित जोशी यांनी केली. आरेतील जंगल हे आदिवासींचे जीवन आहे.  सरकारने  कारशेड दुसरीकडे हलवावी, अन्यथा आदिवासी चिपको आंदोलन करतील, असा इशारा आदिवासी हक्क संवर्धन समितीचे प्रकाश भोईर यांनी दिला.

सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा जाहीर के ला. त्यांनी पर्यावरणप्रेमी आणि आरेतील आदिवासींचे प्रश्न जाणून घेतले.  त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही  दिले. आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांना मात्र स्थानिक रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले.