निशांत सरवणकर

करोनाला आम्ही घाबरत नाही. विलगीकरणात जावे लागते म्हणून खंत वाटते. विलगीकरणाचा काळ संपून कर्तव्यावर कधी येतो, असे वाटत असल्याचे आता पोलीसच म्हणू लागले आहेत. आतापर्यंत ३२०० पोलीस विलगीकरणात होते. त्यापैकी १६०० पोलीस पुन्हा हजर झाले आहेत. अडीचशे पोलीसही पुन्हा कार्यरत होण्याच्या तयारीत आहेत. या पोलिसांचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी करोना बंदोबस्तावरील पोलिसांचे कौतुक केले.

टाळेबंदीला शनिवारी ६० दिवस पूर्ण झाले. यानिमित्त सिंग यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला. करोनाविरुद्धची लढाई पोलिसांसाठीही नवी होती. आतापर्यंत पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखताना समोरील शत्रूची कल्पना होती; परंतु या अज्ञात शत्रूशी दोन हात करताना आमचे ११ पोलीस शहीद झाले, ८९८ पोलिसांना संसर्ग झाला. त्यांत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तरीही पोलीस करोनाच्या लढाईतून मागे हटले नाहीत, याकडेही सिंग यांनी लक्ष वेधले. पोलीस २४ मार्चपासून रस्त्यावर मुंबईकरांचे संरक्षण करीत आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात संसर्गाचे प्रमाण वाढत गेले. बरे झाल्यावर लगेचच पोलीस पुन्हा कर्तव्यावर हजर होत आहेत. त्यांची संख्या पाहिल्यावर पोलीस प्रमुख म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून येत आहे, असेही सिंग म्हणाले.

* करोनाबाधित पोलिसांपैकी ६० टक्के पोलीस मुंबईचे आहेत. राज्यात पोलिसांचे सर्वाधिक मृत्यूही मुंबईत झाले आहेत. तरीही पोलीस दल दटून उभे आहे..

हीच तर कमाल आहे मुंबई पोलीस दलाची. माझा फौजफाटा ४६ हजार पोलिसांचा आहे. यापैकी सध्या ३५ हजार पोलीस कामावर आहेत. ५५ वर्षे वयावरील पोलिसांना आम्ही घरी थांबायला सांगितले आहे, तर ५० वर्षांवरील ज्या पोलिसांना मधुमेह, अति रक्तदाब आदींसारखे आजार आहेत त्यांनाही बंदोबस्ताच्या कर्तव्यातून मुक्त केले आहे. त्यामुळे उर्वरित पोलिसांना अधिक काम करावे लागत आहे. तरीही ते ठामपणे संकटाशी लढत आहेत.

* काही पोलिसांच्या मृत्यूमुळे इतरांच्या मनोधैर्यावर परिणाम होत नाही का?

दक्षता घेऊनही काही पोलिसांना संसर्ग झाला. त्यात दाटीवाटीच्या परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सतत प्रयत्न केला. त्यांच्या वसाहतीत जाऊन कुटुंबीयांशी संवाद साधला. दोन अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्तांसह सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार आदी करोनाबाधित झाले; परंतु ते सर्व जण पुन्हा येण्यास इच्छुक आहेत. पण मीच काही जणांना आणखी काही दिवस आराम करण्यास सांगितले आहे.

* करोनाबाधित पोलिसांना तात्काळ उपचार मिळत नाहीत, अशी तक्रार आहे..

अशा तक्रारी सुरुवातीला आल्या. त्यानंतर पोलिसांसाठी महापालिकेच्या मदतीने दोन स्वतंत्र उपचार केंद्रे निर्माण केली गेली. ८०६ जणांना या ठिकाणी उपचार मिळू शकतात. पोलीस कल्याण निधी आणि पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या साहाय्याने ही व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांसाठी दोन स्वतंत्र फिरते दवाखाने शहर तसेच उपनगरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचा आतापर्यंत सुमारे दहा हजार पोलिसांनी लाभ घेतला आहे. याशिवाय अतिरिक्त पोलीस आयुक्त पातळीवर कोविड कक्ष स्थापन करून रिक्त खाटांची माहिती प्रसारित केली जात आहे. करोनाबाधित पोलिसांशी संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केली जात आहे. केवळ पोलिसांसाठी महापालिकेने दहा रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. पोलिसांसाठी सुरू केलेल्या कोविड हेल्पलाइनवर ही माहिती उपलब्ध आहे.

* पोलिसांच्या स्वतंत्र कोविड हेल्पलाइनला कसा प्रतिसाद आहे?

सहआयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड हेल्पलाइन सुरू केली असून (संपर्क क्र. ९१३७७७७१००/ ९३२१२६३१००/ ९३२१२६२१००) या क्रमांकांवर आतापर्यंत ८२५ पोलिसांनी संपर्क साधला आहे. त्यापैकी ३१० पोलिसांना कोविड रुग्णालये, केअर सेंटर येथे दाखल करून घेण्यात आले आहे. पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली जात आहेत. पोलिसांच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात येत आहे.

* पोलिसांना बंदोबस्ताव्यतिरिक्त अन्य कामे करावी लागत आहेत..

करोनाबाधित परिसर प्रतिबंधित करण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. त्यानंतर तेथील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू मिळतील हे पाहण्याची जबाबदारीही पोलिसांनी पार पाडली. मजुरांना बाहेर पाठविण्यासाठी पोलिसांनी केलेले नियोजन प्रशंसनीय आहे. आतापर्यंत तीन लाख मजुरांना २०४ रेल्वे गाडय़ा तसेच बसगाडय़ांनी त्यांच्या गावी पाठवले आहे. आता पोलिसांच्या दिमतीला सरकारने महसूलचे १४०० कर्मचारी दिले आहेत. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ाही दिल्या आहेत. संवेदनशील २० पोलीस ठाण्यांत हे बळ वापरले गेले आहे. तरीही पोलिसांना संपूर्ण विश्रांती मिळू शकेलच असे नाही. करोनाविरुद्धची लढाई सुरूच राहणार असून त्यासाठी पोलिसांना सज्ज राहावेच लागणार आहे.

* करोनाबाधित पोलिसांना तुम्ही रोख बक्षीस जाहीर केले आहे..

करोनाबाधिताकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो आहे; परंतु आमचा पोलीस कर्तव्य बजावताना करोनाग्रस्त झाला. त्याच्या कर्तव्यदक्षतेचा सन्मान करण्यासाठी त्याच्या खात्यात दहा हजार रुपये जमा केले जातात. त्याच वेळी करोनाग्रस्त पोलिसाला रुग्णालयात दाखल होण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी एक लाख रुपयेही पोलीस कल्याण निधीतून तात्काळ उपलब्ध करून दिले जात आहेत.

* टाळेबंदीच्या काळात मुंबईकरांचा प्रतिसाद कसा होता?

मुंबईकरांची साथ असल्यामुळेच टाळेबंदी यशस्वी होऊ शकली. नियम मोडणाऱ्यांविरुद्ध आम्ही कारवाई केली. दहा हजार गाडय़ा जप्त केल्या, तर पाच ते सहा हजार लोकांना अटक केली. ही कारवाई करताना आम्हाला आनंद होत नव्हता. यापुढेही टाळेबंदी लागू राहील किंवा शिथिल होईल, मात्र त्याबाबत निघणाऱ्या आदेशाचे मुंबईकरांनी पालन करावे, असे आवाहन मी करतो.

भरपाई आणि नोकरीची हमी

दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसाच्या कुटुंबीयांना जशी आर्थिक मदत आणि नोकरीची हमी मिळते, तशीच मदत करोना संकटात बंदोबस्त करताना शहीद झालेल्या पोलिसांना मिळाली पाहिजे, असा आपला आग्रह होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो मान्य केला, असे सिंग यांनी सांगितले. करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसाला ५० लाखांव्यतिरिक्त मुंबई पोलीस फाऊंडेशनमधून दहा लाख तसेच पाच लाख रुपयांचा विमा अशी भरपाई दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.