पहलाज निहलानी यांचे अनुराग कश्यप यांना प्रत्युत्तर; ‘उडता पंजाब’वरून वादंग
होय, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चमचा असून, मला त्याचा अभिमान आहे, असे स्पष्ट करीत चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी बुधवारी ‘उडता पंजाब’ चित्रपटावरून निर्माण झालेला वाद विकोपाला नेला. मी इटालियन पंतप्रधानांचा चमचा बनावे का, असा प्रतिसवाल करीत निहलानी यांनी अनुराग कश्यपबाबत केलेल्या आरोपावरून माफी मागण्याची किंवा राजीनामा देण्याची मागणी फेटाळून लावली.
पंजाबचे वाईट चित्र रंगवण्यासाठी चित्रपटाचे निर्माते अनुराग कश्यप यांनी आम आदमी पक्षाकडून पैसे घेतले असे ऐकिवात आहे, असे वक्तव्य पहलाज निहलानी यांनी केले होते. या वक्तव्याचा अनुराग कश्यप यांच्यासह अनेक चित्रपट निर्मार्त्यांनी निषेध केला. निहलानी यांचा आरोप संपूर्ण चित्रपटसृष्टीचा अवमान करणारा असून, त्यांनी केवळ माफीच मागू नये, तर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी निर्मात्यांनी केली आहे. त्यावर मी जे एकले ते बोललो असून, माफी मागण्याचा किंवा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे निहलानी यांनी सांगितले. अनुरागने म्हटल्याप्रमाणे मी मोदींचा चमचा आहे, असेही ते म्हणाले. शिवाय राजकीय प्रभावामुळे ‘उडता पंजाब’ चित्रपटाला ८९ ठिकाणी कात्री लावण्याची सूचना केल्याचा आरोपही निहलानी यांनी फेटाळला.
चित्रपट परीनिरीक्षण मंडळाने ‘उडता पंजाब’ चित्रपटातील ८९ ठिकाणी कात्री लावण्यास फॅटम फिल्म अँड बालाजी मोशन पिक्चर्स या निर्माता संस्थेस सांगितले आहे. निहलानी हे हुकूमशहा आहेत, असा आरोप कश्यप यांनी मंगळवारी केला होता.

भाजपच्या इशाऱ्यावरून चित्रपटाला कात्री-केजरीवाल
पहलाज निहलानी यांनी भाजपच्या इशाऱ्यावरून हा चित्रपट रोखून धरला आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चित्रपटाला कात्री लावण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. पंजाबमधील अमली पदार्थाच्या वाढत्या वापरावरून आप आणि कॉंग्रेसने सत्ताधारी अकाली दल-भाजप सरकारला लक्ष्य केले आहे.

वास्तव मांडण्याची हिंमतच उरणार नाही-अनुराग
‘उडता पंजाब’च्या निर्मात्यांना आपली कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्याकरिता जे सहन करावे लागते आहे, त्यामुळे यापुढे कोणताही निर्माता-दिग्दर्शक वास्तववादी चित्रपट करण्याची धमक दाखवणार नाही. ‘ब्लॅक फ्रायडे’च्या प्रदर्शनाच्या निमित्तानेही याच अनुभवांना सामोरे जावे लागले होते, असे अनुराग कश्यप यांनी सांगितले.

निहलानींना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी
चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती असूनही चित्रपट उद्योगाच्या उत्कर्षांसाठी काम न करता मुद्दाम चित्रपटकर्मीना सेन्सॉरच्या घोळात अडकवून त्यांचे नुकसान करणाऱ्या पहलाज निहलानींना हटविण्याची मागणी मुकेश भट यांनी केली आहे. सेन्सॉरची प्रक्रिया लांबल्याने चित्रपट निर्मात्यांनी खर्च केलेल्या १० कोटींचे नुकसान कोण भरून देणार असा सवालही त्यांनी केला आहे. एकूणच चित्रपटसृष्टीत निहलानी यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.