करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाउनचा चौथा टप्पा वाढवला आहे. या काळात देशभरातील पोलीस कर्मचाऱ्यांवर बराच ताण आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवताना अनेकदा पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबई पोलिसांनाही गेल्या काही महिन्यात अशा घटनांना सामोरं जावं लागलं आहे. या हल्ल्यांमध्ये अनेकदा पोलीस कर्मचारी जखमी होतात, तर अनेकदा काही कर्मचाऱ्यांना आपले प्राणही गमवावे लागतात. मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे अनोखी मागणी केली आहे.

पोलिसांना पेपर स्प्रे किंवा चिली स्प्रे वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई व्यतिरीक्त सूरत, अहमदाबाद या शहरांमध्ये पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या आपल्या घरापासून दूर अडकलेले परप्रांतीय कामगार घरी जाण्यासाठी पोलिसांवर हल्ला करत असल्याच्या अनेक घटना गुजरातमध्ये समोर आल्या आहेत.