धर्मातरासाठी सक्ती आणि प्रलोभने दाखविणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशाने कायद्यात तरतूद करावी, असे अशासकीय विधेयक भाजपचे अतुल भातखळकर यांनी विधानसभेत शुक्रवारी सादर केले.
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक हे भाजपचे भातखळकर यांचे अशासकीय विधेयक सर्वार्थाने महत्त्वाचे ठरणार आहे. सक्तीने किंवा प्रलोभने दाखवून धर्मातर करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी हा विधेयकाचा उद्देश आहे. कोणत्याही धर्मात लुडबुड करण्याचा प्रश्नच येत नाही, असे भातखळकर यांनी स्पष्ट केले. देशात आतापर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये धर्मातर बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. यानुसार धर्मातर करणाऱ्यांना शासनाकडे त्याची नोंद करावी लागते किंवा कारणे द्यावी लागतात.

एखाद्याला धर्मातर करण्याची इच्छा झाल्यास त्याला रोखणे चुकीचे आहे. भाजपने केंद्र व राज्यात विकासाच्या मुद्दय़ांवर मते मिळविली. विकासकामांना प्राधान्य देण्याऐवजी असे मुद्दे का उकरून काढले जातात.
हुसेन दलवाई , काँग्रेस खासदार