News Flash

प्रत्येक शहरांत संक्रमण शिबिरे!

महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत आहे.

धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

मुंबई:  मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) धोकादायक इमारतींच्या समस्येवर  कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकांनी समूह विकास आराखडा तयार करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सर्व महानगरपालिकांना दिले. त्याचप्रमाणे धोकादायक इमारतींमध्ये  राहणाऱ्या नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी  प्रत्येक महापालिका क्षेत्रात संक्रमण शिबिरे उभारण्याची सूचनाही त्यांनी के ली.

महानगर प्रदेशातील धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत आहे. उच्च न्यायालयानेही या प्रश्नावरून सरकारला अनेकदा धारेवर धरले आहे. त्यामुळे या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, उपायजोजना शोधण्यासाठी नगरविकासमंत्र्यांकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान  सचिव भूषण गगराणी,  प्रधान सचिव महेश पाठक आणि एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाला गती मिळावी यासाठी न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांमध्ये जलद निकाल देण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.  धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडण्यामागे मालक-भाडेकरू यांच्यातील वाद कारणीभूत असून  अनेकदा कायदेशीर प्रक्रियेत स्थगिती मिळत असल्याने पुनर्विकास प्रकल्प रखडत असल्याचे महापालिका आयुक्तांनी यावेळी सांगितले. त्यावर प्रत्येक महानगरपालिकेने आपल्या हद्दीत समूह विकास योजना राबवण्याचा विचार करावा, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.  तसेच ज्या इमारती समूह विकास  योजनेत समाविष्ट होऊ शकत नाहीत, त्याच्या पुनर्विकासासाठी शासनाकडून नक्की काय उपाययोजना करता येतील किंवा सद्य:स्थितीत केलेल्या उपाययोजनांमध्ये नक्की काय बदल करता येतील याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

आपत्ती निवारण पथकांची गरज

धोकादायक इमारत कोसळल्यास तातडीने मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात येते. या पथकाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेनेही आपत्ती निवारण पथक ( टीडीआरएफ) तयार केले आहे. या पथकाने उल्हासनगर इमारत दुर्घटना आणि महाड इमारत दुर्घटनेवेळी उल्लेखनीय काम केले होते. त्यामुळे प्रत्येक महानगरपालिकेने असे तातडीने मदत देऊ शकणारे पथक निर्माण करावे. त्यामुळे दुर्घटना घडल्यास वेळ न घालवता तातडीने मदतकार्य सुरू करून जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवता येईल, असेही  शिंदे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 3:23 am

Web Title: provision temporary accommodation occupants dangerous buildings akp 94
Next Stories
1 अक्षयकुमारचा ‘बेलबॉटम’ २७ जुलैला प्रदर्शित होणार
2 नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात कोऱ्या पाठय़पुस्तकांविनाच
3 पारपत्र नूतनीकरण प्रकरण :  कंगनाला तातडीचा दिलासा नाही
Just Now!
X