ठाणे-पुणे मार्गावर धावणाऱ्या सर्व निमआराम बसेस विनावाहक पद्धतीने सोडण्याच्या निर्णयाला औद्योगिक न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने बुधवारपासून सुरू होणाऱ्या या सेवेला आता काही काळ ब्रेक लागला आहे. या मार्गावर असणाऱ्या निमआराम बसेस विनावाहक पद्धतीने सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. याला महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने कडाडून विरोध करीत थेट न्यायालयात धाव घेतली. औद्योगिक न्यायालयाने कामगार संघटनेची याचिका दाखल करीत विनावाहक सेवेला १४ फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली.
सध्या ठाणे तसेच पुणे मार्गावर निमआराम बसेसच्या ३६ फेऱ्या होतात. त्या सर्व फेऱ्या  विनावाहक करण्यात येणार होत्या. ठाणे आगाराच्या १८ तसेच स्वारगेटच्या १८ अशा दिवसभरामध्ये ३६ फेऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. ठाणे तसेच स्वारगेट या दोन्ही आगारात चालक तसेच वाहकांची संख्या कमी असल्याने अनेकांना जादा काम करावे लागत होते. ते यामुळे थांबेल असा दावा ठाणे विभाग नियंत्रक प्रकाश जगताप यांनी केला. विनावाहक सेवेमुळे प्रवासाचा कालावधीही कमी होईल असेही त्यांनी सांगितले. पण कामगार संघटनेने हा दावा खोडताना हा खासगीकरणाचा प्रयत्न असल्याचे सांगून वाहक तसेच चालकांच्या सेवेवर त्यामुळे गदा येईल असा आरोप केला. कोणत्याही स्थितीत आम्ही कामगारांच्या पोटावर पाय येऊ देणार नाही, असेही कामगार संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.