नऊ महिन्यांपूर्वीच ठाणे पोलीस दलात रुजू झालेल्या एका पोलीस उपनिरिक्षकाने (पीएसआय) सोमवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यातील वर्तकनगरमधील आपल्या राहत्या घराजवळ त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

धनाजी सखाराम राऊत (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या पीएसआयचे नाव आहे. नऊ महिन्यांपूर्वीच ते ठाणे पोलीस दलात रुजू झाले होते. नुकताच त्यांचा नोकरीतील प्रोबेशनचा काळ संपला होता. त्यामुळे त्यांना अंधेरी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीसांत नियुक्ती देण्यात आली होती. मुंबईतील वाडी बंदर येथील मुख्यालयात रुजू होण्याचे त्यांना आदेश मिळाले होते. ताणतणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

पीएसआय राऊत हे ठाण्याच्या वर्तक नगर येथे राहवयास होते. आपल्या घराजवळच एका बागेत सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉक गेल्यानंतर बागेतच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रोबेशनमध्ये असताना राऊत यांच्यावर कुठल्याही प्रकारचा कामाचा ताण नव्हता. या काळात अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारे अधिकची जबाबदारी देण्यात येत नाही.

गेल्या पाच वर्षांत जानेवारी २०१४ पासून मे २०१९ पर्यंत मुंबई पोलीसांतील ८०७ कर्मचाऱ्यांचे विविध आजारांमुळे अकाली मृत्यू झाले आहेत. काही मृत्यू हे अनैसर्गिक, अपघात आणि आत्महत्या केल्यामुळेही झाले आहेत. मुंबई पोलीसांच्या माहितीनुसार, पोलिसांच्या तणावाच्या कामामुळे आणि त्यांच्या विस्कळीत जीवनशैलीमुळे हृदयासंबंधीच्या आजाराने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.