आठवडय़ाची मुलाखत : डॉ. मनोज भाटवडेकर मानसोपचारतज्ज्ञ

शालेय जीवनापासूनच वाढलेली स्पर्धा, विभक्त कुटुंबपद्धती, वाढती अहंभावना, समाजमाध्यमांचे जाळे, सामाजिक प्रतिष्ठा, उत्तेजक द्रव्याचे सेवन यांसारख्या असंख्य कारणांमुळे सध्या शालेय-महाविद्यालयीन मुलांमध्ये नैराश्य वाढते आहे. ‘निर्मला निकेतन’ या समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनात १४ ते १७ या वयोगटांतील मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रेमसंबंधातील नकार आणि आपापसातील स्पर्धेतून निर्माण होणारा दबाव ही नैराश्यामागील प्रमुख कारणे आहेत. या पाहणीच्या निमित्त मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर यांच्यासोबत केलेली ही बातचीत.

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
How Much Expenditure on Salary of Retired Contract Teachers
सेवानिवृत्त निवृत्त कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावर किती खर्च? जाणून घ्या सविस्तर…

* लहान मुलांमध्ये नैराश्य वाढण्यामागची काय कारणे आहेत?

गेल्या काही वर्षांत लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. परिणामी स्पर्धाही वाढली आहे. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच चांगले गुण मिळविण्याबाबत दबाव येतो. त्यातून अभ्यासाचा ताण वाढतो. ही परिस्थिती अगदी बालवर्ग आणि शिशूवर्गापासून सुरू होते. त्याशिवाय नृत्य, संगीत, गायन, वाद्य यांसारखे छंद जोपासतानाही दुसऱ्या मुलांशी तुलना करून या छंदातून आनंद घेण्याऐवजी घातक स्पर्धा निर्माण केली जाते. याला आपली शिक्षण पद्धती बऱ्याच अंशी जबाबदार आहे. आवडीचे विषय शिकण्याऐवजी सर्वच विषय शिकण्याचा व त्यात सर्वोत्तम गुण मिळविण्याचा अट्टहास पालकांकडून केला जातो. या अट्टहासातून ताणतणाव वाढतात. त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला नाही तर मुले नैराश्याच्या गर्तेत ढकलली जातात. एखादे मूल नापास झाले तर त्याला ‘ढ’ समजून समाज निकालात काढतो. यातूनच खासगी शिकवण्या वाढल्या आहेत. मुले महाविद्यालयात न जाता अशा खासगी शिकवण्यांमध्ये जातात. शिकवण्यांमध्येही १०० टक्के निकालासाठी मुलांवर दबाव टाकला जातो. तिथे शिकवणारे ‘शिक्षक’ मुलांना मारताना आम्ही पाहिले आहेत. रविवारच्या टेस्टमध्ये २० पैकी १९ गुण मिळाले म्हणून मुलांना शिक्षा केली जाते. मुलाला चांगले गुण मिळतील म्हणून पालकही याला दुजोरा देतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांचे म्हणणे ऐकून घ्यायला घरात कोणीच नसते. अशा वेळी ही मुले प्रेम, आनंद, सुख बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. यातून मद्यसेवन, धूम्रपान यासोबतच समाजमाध्यमांचे व्यसन लागते. यामध्ये अडकल्यामुळे भावना कशा, कधी व्यक्त कराव्यात याची मूलभूत माहिती नसलेली मुले अतिरेकामुळे निराश होतात.

* किशोरवयातील प्रेमसंबंधांतील नैराश्यविषयी काय सांगता येईल?

किशोरवयीन मुलांच्या हातातच स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे चित्रपट आणि मालिका पाहणे त्यांच्यासाठी सोयीचे झाले आहे. या चित्रपटांत लहान वयातच प्रेमसंबंध दाखविले जाते. याच्या आहारी गेलेली मुले बाहेर प्रेम शोधायचा प्रयत्न करतात. मात्र प्रेमसंबंध टिकविण्याकरिता भावनांमधील क्लिष्टता समजत नाते अधिक गुंतागुंतीचे होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लहानपणापासून मुलांना मिळणारी शिकवण. लहान वयापासूनच मुलांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण केल्यामुळे मोठेपणी कुणाकडूनही आलेला नकार त्यांना स्वीकारता येत नाही. त्यामुळे प्रेमसंबंधात समोरच्या व्यक्तीला स्वत:चा पैस आहे व त्याला नकार देण्याचा अधिकार आहे हेच मुले लक्षात घेत नाहीत. आणि नकार दिल्यानंतर अहं दुखावल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते. सध्या महाविद्यालयात प्रियकर-प्रेयसी हे प्रतिष्ठेशी जोडले गेले आहे. त्यामुळे प्रियकर-प्रेयसी नसणे हे कमीपणाचे आहे अशी समजूत या मुलांमध्ये निर्माण झाली आहे.

* भावनिक शिक्षणाचा फायदा कसा होऊ  शकतो?

भावनिक शिक्षणात मुलांना भावना कशा व्यक्त कराव्यात याबद्दलचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांना राग आल्यावर चिडचिड करू नये हे सांगितले जाते. परंतु राग कसा व्यक्त करावा हे सांगितले जात नाही. मुलांना स्वत:च्या भावना ओळखता यायला हव्या आणि त्या योग्य पद्धतीने व्यक्त करता येणे गरजेचे आहे. स्वत:ला अभ्यासासाठी उद्युक्त करणे हा भावनिक शिक्षणाचा महत्त्वाचा भाग. अभ्यास आपण का करतो, तो आपल्याला आवडतो का हे आधी स्वत:ला विचारा. त्यानंतर येणाऱ्या उत्तरातून आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उकल होईल.

* शाळा व महाविद्यालयांमधील समुपदेशकांची संख्या पुरेशी आहे का?

शाळा व महाविद्यालयातील समुपदेशकांची संख्या अपुरी आहे. सध्या १००० मुलांमागे एक समुपदेशक आहे. अनेक शाळांमध्ये तर समुपदेशकही नाहीत. समुपदेशकांची संख्या कमी व मुलांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून शिक्षकांनाच समुपदेशनाचे शिक्षण देता येऊ शकते. नैराश्याची लक्षणे, मानसिक आरोग्य याबाबतची जुजबी माहिती शिक्षकांना असेल तर त्यांना विद्यार्थ्यांशी बोलून नैराश्याच्या गर्तेत असलेला विद्यार्थी शोधणे सोपे होईल. अति झोप किंवा झोप न लागणे, भूक न लागणे, उत्साह नसणे, एकाग्रता नसणे ही नैराश्येची लक्षणे आहेत. अशा मुलांबाबत त्यांच्या पालकांशी संवाद साधल्यास वेळेत समुपदेशन व उपचार सुरू करता येईल. तसेच केवळ शाळा-महाविद्यालयांमध्ये समुपदेशक नेमून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी कुटुंब संस्था व शिक्षण संस्था मिळून विद्यार्थ्यांसाठी आधारयंत्रणा तयार व्हायला हवी. हा दोन्ही आधार मिळाला तर मुलांना मानसिकदृष्टय़ा भक्कम करता येऊ  शकते. यासाठी मुलांमध्ये काही बदल दिसल्यास त्यावर टीका न करता मुलांशी संवाद साधून त्यांची भावना समजून घ्यावी व त्यानुसार मार्ग निवडावा.

* मुलांसाठी आनंद कसा शोधता येईल?

सध्या सुबत्ता असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांच्या पालकांनी कुठली गाडी आणली याचीसुद्धा तुलना केली जाते. सामाजिक प्रतिष्ठा व अहं याचे ओझे मुलांवरही टाकले जाते. यासाठी चांगले गुण, उच्च दर्जाचे महाविद्यालय, नामांकित करिअर क्षेत्र याची निवड करण्यासाठी पालक अट्टहास करतात. यातून चंगळवाद व भौतिकवाद फोफावत चालला आहे. छंद जोपासतानाही हीच परिस्थिती असते. मानसिक ताण कमी करण्यासाठी मैदानी खेळ, सहली यांचेही प्रमाण कमी झाले आहे. तर किशोरवयीन मुलांसाठी सहलीतील आनंद हा केवळ उत्तेजित द्रव्यांपुरता मर्यादित राहिला आहे. सुख आणि आनंद यांची सीमारेषाच आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे मुलांनी सुखाच्या मागे धावण्यापेक्षा आनंद शोधावा. ज्यामुळे उत्तरोत्तर विद्यार्थी अधिक प्रगल्भतेकडे वाटचाल करतील.

 मुलाखत – मीनल गांगुर्डे