22 October 2020

News Flash

मुलांमधील नैसर्गिक ऊर्मीना नियमनाची गरज

‘लोकसत्ता चतुरंग चर्चे’त मानसोपचार आणि इंटरनेटतज्ज्ञांचे मत

‘लोकसत्ता चतुरंग चर्चे’त मानसोपचार आणि इंटरनेटतज्ज्ञांचे मत

मुंबई : सध्याच्या जगात मुलांना इंटरनेट आणि मोबाइलपासून दूर ठेवणे अशक्य असून त्यांनी त्यावर काय बघावे यावरही पालक एका मर्यादेपलीकडे नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत मुले लहान असल्यापासून त्यांना आपल्या कृतींच्या परिणामांचे तारतम्य ओळखायला शिकवणे, हेच आजच्या पालकांसमोरचे खरे आव्हान आहे. मुलांमधील नैसर्गिक ऊर्मीना खरी नियमनाची गरज आहे, असा सूर मानसोपचार आणि इंटरनेटतज्ज्ञांकडून व्यक्त झाला.

दिल्लीतील १८ वर्षांंखालील मुलांच्या ‘बॉइज लॉकर रूम’ या इन्स्टाग्राम ग्रुपवर मुलींविषयी होणारी विकृत चर्चा नुकतीच ‘व्हायरल’ झाल्यानंतर पालकत्वाविषयीच्या अनेक समस्या उपस्थित केल्या जाऊ लागल्या. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता चतुरंग चर्चा’ या नवीन उपक्रमाच्या माध्यमातून गुरुवारी ‘बॉइज लॉकर रूम- एक धडा’ या विषयावर  वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मानसोपचार आणि लैंगिक विषयांसंबंधीचे तज्ज्ञ डॉ. राजन भोसले, मानसशास्त्रज्ञ डॉ. शुभा थत्ते आणि ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेचे सहसंस्थापक  उन्मेष जोशी यांनी या वेबसंवादात मार्गदर्शन केले, तसेच पालकांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.

डॉ. भोसले म्हणाले, ‘‘मुले वयात येताना संप्रेरकांमुळे त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांची त्यांना काही प्रमाणात माहिती असते. पण या काळात मनात ज्या नवीन भावना झंझावातासारख्या निर्माण होतात त्यासाठी मनाची मात्र तयारी नसते. या भावनांचा निचरा कसा करावा हे कळत नसल्यामुळे कुतूहल शमवण्यासाठी ती वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून पाहतात. इंटरनेट आणि मोबाइल नसतानाही हे होतच असे. आता केवळ त्याच्या प्रकटीकरणाचे माध्यम बदलले आहे. त्यांनी इंटरनेटवर काय पाहावे याला मज्जाव करणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य नसले तरी जे पाहिले त्याचा अर्थ काय घ्यायचा आणि कृती करताना योग्य-अयोग्य काय ठरेल, या परिणामांचे भान मुलांना करून द्यावे लागते.’’

‘‘मूल जन्मल्यापासून पालकांच्या त्याच्याशी असलेल्या वागण्यातूनदेखील एक प्रकारे त्याचे लैंगिक शिक्षण सुरू झालेले असते. आपण मुलांना शरीराच्या अवयवांची माहिती देताना जननेंद्रियांविषयी बोलणे टाळतो किंवा त्या अवयवांसाठी वेगळीच चुकीची नावे वापरतो, अशा लहान उदाहरणांमधूनही मुले ती गोष्ट मोकळेपणाने बोलण्याची नाही, हे नकळत शिकत असतात. घरात आई-वडिलांमध्ये परस्पर सन्मानाचे नाते, पालक आणि मुलांमध्ये मोकळा संवाद आणि पालकांना प्रश्न विचारण्याची मुलांना मुभा असणे याला खूप महत्त्व आहे,’’ असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

‘वयात येणे’ ही संकल्पना आता ‘टीनएज’ अशी राहिली नसून मुलामुलींच्या शरीरात ९-१० वर्षांंचे असल्यापासूनच बदल घडत असतात, असे डॉ. थत्ते यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘‘विचार आणि भावनांची ऊर्मी ताब्यात ठेवण्याचे भान मात्र व्यक्तीला १७-१८ व्या वर्षी येते. लैंगिक शिक्षण हे कोणत्याही दोन व्यक्तींचे नाते कसे असावे याच्या शिक्षणापासून सुरू होते. मुले आणि पालक हा संवाद १८ व्या वर्षी स्थापन करता येत नसून तो लहानपणापासूनच सुरू व्हावा लागतो. ते पालकांना शिकून घ्यावे लागते. मुलांच्या आयुष्यात रस घेणे, संवादाच्या नवनवीन संधी निर्माण करणे आणि संवादाची दारे सतत खुली ठेवणे पालकांना करावे लागते.’’

जोशी म्हणाले,‘‘अनेकदा मुलांना सांभाळताना ‘बेबीसिटर’ म्हणून मोबाइलसारखी गॅजेटस् पालकांकडून वापरली जातात. मुलांशी कसे बोलावे याबाबतीत अनेक पालक सक्षम नसतात, परंतु लैंगिक शिक्षण आणि इंटरनेट वापरातील धोक्यांच्या बाबतीत विविध संस्था काम करत असून त्याबद्दल चांगले साहित्य उपलब्ध आहे, त्याची पालकांना मदत घेता येईल. पालक, शिक्षक आणि मुलांच्या वाढीशी निगडित असलेल्या इतर व्यक्तींनाही या विषयांमध्ये प्रशिक्षण देण्याची गरज आहे. इंटरनेटबद्दल नकारात्मक भूमिका घेण्यापेक्षा त्यातील सकारात्मक गोष्टींची ओळख मुलांना करून द्यायला हवी.’’

तज्ज्ञ म्हणतात.. इंटरनेट आणि मोबाइल नसतानाही युवकांमधील भावनांचा निचरा वेगवेगळ्या प्रकारे होतच असे. आता केवळ त्याच्या प्रकटीकरणाचे माध्यम बदलले आहे. त्यांनी इंटरनेटवर काय  पाहावे यावर मज्जाव न करता त्यांच्या या कृतीचा परिणाम काय होईल, याचे भान पालकांनी आपल्या बालकांना द्यावे. इंटरनेटमधील सकारात्मक बाबींची मुलांना ओळख करून द्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 3:41 am

Web Title: psychiatrists and internet experts opinions in loksatta chaturang charcha zws 70
Next Stories
1 पश्चिम घाट संवदेनशील क्षेत्रातून ३८८ गावे वगळावीत
2 राज्य सरकारविरोधात भाजपचे आज आंदोलन
3 राज्यात आजपासून जिल्हांतर्गत एसटी सेवा
Just Now!
X