प्रथम आत्महत्येचा विचार मनात घोळत असतो, त्यानंतर आत्महत्या कशा प्रकारे करायची यावर विचार सुरू होतो. या टप्प्यावरूनही योग्य मानसिक मदत केल्यास आत्महत्येचा प्रसंग टाळता येऊ शकतो परंतु आता कोणताच मार्ग शिल्लक नाही, अशी स्थिती येते आणि एका नेमक्या क्षणी व्यक्ती आत्महत्या करते. मंत्रालयात आज एका तरुणाने केलेली आत्महत्या तसेच यापूर्वी झालेल्या आत्महत्यांना प्रसिद्धी आणि उदात्तीकरणाचे एक स्वरूप माध्यमांमुळे मिळाल्यानंतर आत्महत्येचा विचार करणाऱ्यांची पावले मंत्रालयाकडे वळू लागली असून आगामी काळात हे प्रमाण वाढण्याची भीती ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मंत्रालयात आज हर्षल रावेत या तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. गेल्या महिन्यात ८० वर्षांच्या धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर या आत्महत्येचे जे उदात्तीकरण झाले व त्यांच्या अंत्ययात्रेला मंत्र्यांपासून वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी लावलेली उपस्थिती यातून आत्महत्येच्या अंतिम निर्णयाच्या स्थितीला आलेल्यांची पावले आपोआप मंत्रालयाकडे वळू लागल्याचे दिसते. यालाच इंग्रजीत ‘कॉपी कॅट’ म्हणतात, असे केईएमच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले. असेच मत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप जाधव व डॉ. मनोज भाटवडेकर यांनीही व्यक्त केले. जगणे असहय़ झाले आहे, आता कोणताच मार्ग दिसत नाही, अशा मानसिक सापळ्यात अडकल्याच्या अवस्थेत पंधरा दिवस होतात तेव्हा मेंदूमध्ये होणारी रासायनिक प्रक्रिया अत्महत्येच्या टोकापर्यंत नेताना दिसते. अर्थात याही अवस्थेत अशा व्यक्तीला योग्य उपचार मिळाल्यास तसेच मानसिक आधार दिला गेल्यास तो या आजारातून बाहेर येऊ शकतो, असे डॉ. संदीप जाधव यांनी सांगितले. यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात अचानक आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले दिसले होते.

तसे पाहिले तर आत्महत्या होतच असतात परंतु ठरावीक पद्धत नजरेसमोर दिसते तेव्हा आपण आत्महत्या कशी करावी ही संकल्पना तयार होते आणि व्यक्ती त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते, असेही डॉ. जाधव म्हणाले. ‘जागतिक आरोग्य संघटना’ तसेच ‘सुईसायडल मॅन्युअल्स’मध्ये अशा आत्महत्यांना माध्यमांनी पहिल्या पानावर बातमी देऊ नये, असे मार्गदर्शक तत्त्व नमूद केले आहे. अशा लोकांसाठी ‘आधारगट’ निर्माण केले पाहिजेत तसेच ज्यांनी मंत्रालय अथवा अन्यत्र आत्महत्येचा प्रयत्न केला, अशा लोकांवर केवळ गुन्हा दाखल करण्याऐवजी सरकारने तसेच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मानसिक आजारातून बाहेर येण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे डॉ. मनोज भाटवडेकर यांनी सांगितले. सरकारने केवळ मंत्रालयात येण्यावर र्निबध घातल्याने हा प्रश्न सुटणार नाही तर आत्महत्या करू पाहणाऱ्यांकडे आजारी व्यक्ती म्हणून सहानुभूतीने पाहणे व वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे अन्यथा मंत्रालयात येऊन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती या डॉक्टरांनी व्यक्त केली.