कमला मिल आग प्रकरणात समितीचा ठपका

मुंबई : कमला मिल येथील ‘मोजो बिस्त्रो’ आणि ‘वन-अबव्ह’ या दोन पबना लागलेल्या आगीसाठी मिलचा मालक रमेश गोवानी याच्यासह दोन्ही पबचे सहा सहमालक प्रामुख्याने कारणीभूत असल्याचा ठपका उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने ठेवला आहे. तसेच त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

भविष्यात अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिका आणि सरकारी विभागांना खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

निवृत्त न्यायमूर्ती ए. व्ही. सावंत, वास्तुविशारद वसंत ठाकूर आणि पालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांच्या त्रिसदस्यीय समितीने दोन दिवसांपूर्वीच या आगीच्या चौकशीचा मोहोरबंद अहवाल न्यायालयात सादर केला होता. बुधवारी या अहवालाची प्रत उपलब्ध झाली. या अहवालानुसार, मिलच्या एकूण मालमत्तेपैकी ९५ टक्के समभाग गोवानी याचा, तर उर्वरित रवी भंडारी याच्या मालकीचा आहे. गोवानी यानेच दोन्ही पबच्या मालकांना चटईक्षेत्र निर्देशांक नियमांचे उल्लंघन करून बेकायदा बांधकाम करण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी दोन्ही पबचे मालक गोवानी याला प्रत्येक महिन्याला प्रत्येकी ३८ लाख रुपये देत होते, असेही समितीने गोवानी आणि अन्य आरोपींना या आगीसाठी जबाबदार ठरवताना नमूद केले आहे.

दोन्ही पब मालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याकडे मिलच्या मालकाने हेतुत: दुर्लक्ष केले, तर पबच्या मालकांनीही सगळ्या नियमांची पायमल्ली केली. गच्चीच्या भागात त्यांनी मद्य, केरोसीन आणि कोळशाचा साठा ठेवला होता. याच भागात हुक्का पार्लरही होते. अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून हे सगळे करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांना आग लागल्यावर काय  करावे याचे प्रशिक्षणच देण्यात आलले नव्हते. या आगीत १४ जण मृत्यूमुखी पडले होते.

अबकारी विभागाचे अधिकारीही अडचणीत

समितीने आपल्या अहवालात अबकारी विभागातील तीन अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवला आहे. अधीक्षक ए. बी. चाकसर यांच्यासह निरीक्षक संदीप मोरे आणि विजय थोरात यांनी दोन्ही पबमालकांकडून करण्यात आलेल्या नियमांच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा शेरा समितीने मारला आहे.