टाळेबंदी शिथिलीकरणाच्या टप्प्यात मिळालेल्या परवानगीचा गैरफायदा घेत मुंबईतील ‘नाइट क्लब’मध्ये रात्रभर सुरू असलेल्या धिंगाण्यामुळे करोनाचा धोका वाढू लागला आहे. मुखपट्टी न घालता, शारीरिक अंतराचे नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी गर्दी जमत असल्याचे पालिकेच्या छाप्यात समोर आले आहे. करोना निर्बंधांचे पालन होत नसल्याने मुंबईत रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करावी, अशी शिफारसच पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यावरून आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

“बार, पब मुळे करोना वाढला.. आता नशा उतरली..? पालिकेला नाईट कर्फ्यू लावायची वेळ आली. पब, पार्टी गँगने वेळ वाढवून मागितली होती…या गँगला आता जबाबदार धरणार का? मुख्यमंत्री आरोग्याचे आवाहन करतात..तर पब, पार्टी गँग अनधिकृतपणे धिंगाणा घालतात! ही गँग मुख्यमंत्र्यापेक्षा मोठी आहे का?” असं आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे.

करोना नियमांचे उल्लंघन करून बार/पब बेकायदेशीरपणे चालवले जात आहेत, हे लाजीरवाणं आहे. करोना सक्रीय आहे, मुंबईकर मरत आहेत. मुख्यमंत्री दरररोज जबाबदारीने वागा व घरात राहण्यास सांगत आहेत. मग बीएमसीला बार/पबवर नाईट कर्फ्यू लावण्यापासून कोण रोखत आहे? पब/पार्टी गँग ही मुख्यमंत्री/बीएमसी पेक्षा जास्त शक्तीशाली आहे का? असं देखील शेलार यांनी म्हटलं आहे.

‘नाइट क्लब’मुळे रात्रीची संचारबंदी?

तर, छाप्यानंतर लोअर परळ आणि वांद्रे येथील दोन क्लबविरोधात महापालिकेने स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या पाश्र्वाभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची लेखी शिफारस राज्य सरकारकडे केली आहे.

करोनामुळे कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता केवळ ५० लोकांनाच परवनागी दिली जाते. तसेच सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचे व सार्वजनिक ठिकाणी मुखपट्ट्या लावण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र मुंबईतील ‘नाइट क्लब’मध्ये हे सर्व नियम धुडकावून लावले जात आहेत. या क्लबमध्ये हजारोनी गर्दी जमत असते. तसेच हे क्लब पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असतात. महानगरपालिकेने लोअर परळ येथील तोडी मिल कपाऊंडमधील ‘एपिटोम क्लब’मध्ये तसेच वांद्रे येथील एका क्लबवर धाडी टाकल्या असता ही बाब उघडकीस आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली.