मुंबई : रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्करू नका. तुमच्या घरी कोणी वाट पाहात आहे, असा संदेश मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून देण्यात आला आहे. रूळ ओलांडणे, महिला सुरक्षा व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी सचिन आता पश्चिम रेल्वेसाठी दूत म्हणून काम करणार आहे. त्यासंदर्भात त्याचे आवाहन करणारे संदेश उपनगरीय रेल्वे स्थानकांबरोबर सिनेमागृह, रेडिओतही ऐकविले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

जनजागृतीचा भाग बनवण्यासाठी पश्चिम रेल्वेने सचिनची भेट घेतली होती. त्यावेळी त्याने लोकलशी आपला जवळचा संबंध असल्याचे सांगितले. वांद्रेहून चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियमला प्रशिक्षणाला जाण्यासाठी लोकलने प्रवास करत असल्याची आठवणही सांगितली.

यावेळी आपल्या संदेशात त्याने रूळ ओलांडण्याचा धोका कुणीही पत्करू नये आणि तुमच्या घरी कोणी वाट पाहात आहे हे लक्षात घ्या, असेही स्पष्ट केले. पादचारी पूल, सब वे, सरकते जिने याचा वापर करा, असे आवाहनही केले. त्याचबरोबर महिला प्रवाशांची सुरक्षा ही सर्वाचीच जबाबदारी असल्याचे सांगतानाच महिला प्रवाशांनी हेल्पलाइन क्रमांक १८२ आणि रेल्वेच्या मोबाइल अ‍ॅपचा वापर करण्याचीही सूचनादेखील केली.