इंटरनेट, एटीएम, उपाहारगृह, वाहनतळांची सुविधा

राज्यातील राज्य मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पहिल्या टप्प्यात शंभर ठिकाणी प्रसाधनगृहांसह जनसुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रामध्ये सार्वजनिक प्रसाधनगृहासह, उपहारगृह, इंटरनेट, एटीएम आणि वाहनतळाचीही सुविधा उपलब्ध असेल. त्याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

राज्यातील महामार्गावर अनेक ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या/ शौचालयाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषत: महिला प्रवाशांसाठी यामुळे गैरसोय होते. या गोष्टी विचारात घेऊन महिलांच्या राईट टू पी व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य मार्ग व प्रमुख राज्य मार्गावर जनसुविधा केंद्रे उभारण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांबरोबर करार केला आहे. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह आणि पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तीन कंपन्यांचा समावेश आहे. यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन ते पाच एकर जागा या कंपन्यांना भाडेपट्टय़ावर देण्यात येणार आहेत. या ठिकाणी कंपन्या पेट्रोलपंप, सार्वजनिक प्रसाधनगृहे, इंटरनेट व दूरध्वनी सुविधा, उपहारगृह/रेस्टॉरंट, एटीएम केंद्रे तसेच वाहनांसाठी वाहनतळ आदी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. राज्यातील रस्त्यांलगत बसस्थानकांशिवाय कोठेही सार्वजनिक प्रसाधनगृहे उपलब्ध नाहीत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेषत: महिलांची गैरसोय होत होती. यामुळे बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या राज्य व प्रमुख राज्य मार्गावर उपलब्ध असलेल्या जागेवर ही व्यवस्था करण्यात येणार असून ती मार्गावरून जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. वाहनतळ आणि प्रसाधनगृहाची सुविधा मोफत असेल. तसेच या सर्व सुविधांची देखभाल या कंपन्या करणार आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात राज्यातील शंभर  ठिकाणी ही जनसुविधा केंद्र उभारण्यात येणार असून त्यानंतर टप्याटप्याने राज्यातील सर्व  प्रमुख मार्गावर ही सुविधा निर्माण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.