अर्ध्या शुल्कात मासिक पास; महिनाभरात अंमलबजावणी

पालिकेच्या २६ सार्वजनिक वाहनतळांवर गाडय़ा उभ्या करण्यासाठी सध्या जे दर लावण्यात आले आहेत त्यात स्थानिक नागरिकांना सवलत मिळणार आहे. स्थानिक नागरिकांना तब्बल अर्ध्या किमतीत मासिक पास मिळणार आहे. येत्या महिन्याभरात ही सवलत लागू होणार आहे. सार्वजनिक वाहनतळांपासून ५०० मीटरच्या परिसरात गाडय़ा लावणाऱ्यांवर पालिकेने कारवाई सुरू केल्यानंतर पार्किंगचे दर कमी करण्याची मागणी विविध विभागांतून होऊ लागली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

पालिकेचे एकूण १४६ वाहनतळ असून त्यापैकी २६ सार्वजनिक वाहनतळ आहेत.  विकासकांकडून ताब्यात घेतलेले २६ सार्वजनिक वाहनतळ हे इमारतीत, टॉवरमध्ये असल्यामुळे स्थानिक रहिवासी त्या ठिकाणी गाडय़ा उभ्या करायला जात नाहीत.  त्यामुळे हे वाहनतळ ओस पडले होते. म्हणूनच पालिकेने या वाहनतळाच्या परिसरात गाडी लावणाऱ्यांविरोधात ७ जुलैपासून कारवाई सुरू केली आहे.  वाहनचालकांकडून पाच ते पंधरा हजारांपर्यंत दंड वसूल केला जात आहे. या कारवाईला विविध कारणांमुळे मोठय़ा प्रमाणावर विरोध होऊ लागला. या सार्वजनिक वाहनतळांवर असलेले पार्किंगचे दर खूप जास्त असल्याची तक्रार रहिवासी करू लागले होते. दक्षिण मुंबईत नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, मध्य मुंबईतील नगरसेवक समाधान सरवणकर, अमेय घोले यांनी पालिका आयुक्तांना भेटून हे दर कमी करण्याची मागणी केली होती. दक्षिण मुंबईत तर हे दर खूपच जास्त आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहनतळांवरील पार्किंगचे दर रहिवाशांसाठी कमी करण्याचे पालिका आयुक्तांनी ठरवले असून अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत.  ही सवलत व्यावसायिक वाहनांसाठी नसेल.

पालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या पार्किंग धोरणात मुंबईतील रस्त्यांचे अ, ब व क असे तीन वर्ग करण्यात आले होते. त्यात व्यापारी, रहिवासी अशा परिसरानुसार हे वर्ग करण्यात आले होते. त्या वर्गानुसार पार्किंगचे निरनिराळे दर ठरवण्यात आले होते.

विकासकांकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या सार्वजनिक वाहनतळांवर मासिक पासाचे दर रहिवाशांसाठी ५० टक्के करण्यात येतील, तसे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या वाहनतळाच्या परिसरात असलेल्या रहिवाशांची त्याकरिता नोंदणी करण्यात येईल. तसेच एका फ्लॅटमागे एकाच गाडीला ही सवलत असेल.     – प्रवीणसिंह परदेशी, पालिका आयुक्त

दर असे

  • श्रेणी ए – फोर्ट, हुतात्मा चौक, हॉर्निमन सर्कल, बॉम्बे हॉस्पिटल लेन, चर्चगेट, जहाँगीर आर्ट गॅलरी, नरिमन पॉइंट, ताजमहल हॉटेल, दादर टी.टी., जी.बी. मार्ग, गोरेगाव स्पोर्ट्स क्लब अशा ठिकाणी पार्किंगसाठी प्रत्येक तासाला ६० रुपये.
  • श्रेणी बी – रिगल सिनेमा, पोलीस जिमखाना, नेपीयन्सी रोड, फेमस स्टुडिओ लेन, बी.जी. खेर मार्ग, न्यू प्रभादेवी रोड या ठिकाणी पार्किंगसाठी ४० रुपये.
  • श्रेणी सी – बी.डी. माझदा अपार्टमेंट, घाटकोपर, माहुल रोड शॉपर्स स्टॉपजवळ या ठिकाणी २० रुपये ताशी पार्किंगचे दर आहेत.