आर. के. लक्ष्मण यांच्या अंत्यदर्शनाला मी गेलो असता तिथे १०० माणसेही हजर नव्हती. यावरुनच कळते की, सर्वसामान्य माणसाला कलाकारांबद्दल काहीच माहीत नसते. याउलट युरोपातील नागरिकांना त्यांच्या कलाकारांबद्दल सर्व माहिती असते. खरे तर कलेला जनता जनार्दनाचा रेटा पाहिजे, असे मत व्यंगचित्रकार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. बुधवारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. सबनीस यांची व्यंगचित्र कारकीर्द ५० व्या वर्षांत पदार्पण करत आहे.
पाच वर्षांत विकास दिसला की नाही माहीत नाही. पण ५० वर्षांचा विकास नक्की दिसला, असे म्हणताना व्यंगचित्रकलेत आर. के., बाळासाहेबांनंतर विकास सबनीसच आहेत, असेही राज यांनी आवर्जून सांगितले. प्रत्येक चित्र काढताना त्याच्या साधक—बाधक परिणामांचा मी विचार करतो. त्यातला बाधक भाग कमी करतो. त्यामुळे माझे एकही व्यंगचित्र वादग्रस्त ठरलेले नाही. आर. के. आणि बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी मला मोहीत केले, असे सबनीस यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.
व्यंगचित्राचे वर्तमानपत्रांतून उच्चाटन झाले आहे. पहिल्या पानावरुन ते आतल्या पानावर जाऊन पडले आहे. एखाद्य व्यंगचित्रकाराचे चित्र आम्हाला हवेच असे म्हणणारी संघटीत वाचकशक्ती आपल्याकडे नाही, अशी खंत व्यक्त करताना व्यंगचित्राला उपरेपणाची वागणूक का, असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांनी उपस्थित केला. या कार्यक्रमाला ‘कार्टून्स कंबाईन्स’चे अध्यक्ष संजय मिस्त्री, ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 2:45 am