‘भारत बंद’ला एसटी, रेल्वे, रिक्षा-टॅक्सी, बेस्ट कामगार संघटनांनी नैतिक पाठिंबा दिला आहे. करोनाकाळात या अत्यावश्यक सेवा असल्याने त्या बंद न ठेवता विविध ठिकाणी फक्त निदर्शने करण्यात येणार आहे. ओला, उबेर कामगार संघटनांनी मात्र बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे या सेवेवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारत बंद आंदोलनामुळे एसटीच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊन प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश एसटी महामंडळाने राज्यातील सर्व विभागीय अधिकारी, आगार प्रमुखांना दिल्या आहेत. तसेच बंद काळात एसटीच्या सेवेवर लक्ष ठेवण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून मुंबईतील एसटीच्या मुख्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

बंद काळात त्या त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन एसटी सेवा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन, विभागीय अधिकारी, आगारप्रमुख घेणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्न्ो यांनी सांगितले.

या बंदला नैतिक पाठिंबा दिला असून एसटी सेवा सुरळीतच राहील, अशी माहिती मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. तर एसटीतील शिवसेनेच्या संघटनेनेही एसटीला करोनाकाळातही आर्थिक फटका बसल्याने ती बंद न करता शांततेने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी स्पष्ट केले.

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महासचिव वेणु नायर यांनीही रेल्वे सेवा अत्यावश्यक असल्याने ती बंद न ठेवता शांत मार्गाने काही ठिकाणी निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष आणि बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव हे आंदोलनात सहभागी होत नसल्याचे म्हणाले. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे महासचिव ए.एल.क्वाड्रोस यांनी आंदोलनात सहभागी होत नसल्याचे सांगितले.