News Flash

शहरबात : ‘ते’ आणि आपण!

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खरोखरीच बोध घेण्यासारखा आहे

लोकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असा कोपनहेगन महापालिकेचा प्रयत्न असतो.

वाहतूक कोंडी आणि वाहने उभी करण्याची समस्या आपल्या देशातील सर्वच शहरांसाठी कळीचा मुद्दा बनली आहे. आर्थिक स्तर उंचावत असल्याने जास्तीत जास्त नागरिक स्वत:चे वाहन खरेदी करत आहेत. त्यामुळे वाहनसंख्या वाढून वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. ही परिस्थिती आपल्या देशातच नव्हे तर, जगातील अनेक महानगरांत आहे. अशा वेळी डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपनहेगनचा आदर्श आपल्याकडच्या राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनांनी घ्यायलाच हवा.

वाहतूक कोंडी आणि प्रदूषण टाळण्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे, असे वारंवार आवाहन केले जाते. अगदी अलीकडेच दिल्लीतील मेट्रोच्या विस्तारीकरण कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भर दिला. केंद्रात काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार सत्तेत असताना जवाहरलाल नेहरू नागरी कार्यक्रमांतर्गत शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुधारण्याकरिता बसेस खरेदी करण्याकरिता आर्थिक मदत देण्यात आली होती. दिल्लीत मेट्राचे जाळे विणले तरीही अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम झालेली नाही. मुंबईत ‘बेस्ट’ प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत त्रुटी आहेतच.

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खरोखरीच बोध घेण्यासारखा आहे. मुंबई वा दिल्लीप्रमाणेच कोपनहेगन शहरात वाहतूक वर्दळ आणि वाहने उभी करण्याची मोठी समस्या आहे. त्यातच शहरातील मोक्याच्या ठिकाणी वाहने उभी करण्याकरिता प्रचंड दर आकारला जातो. लोकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असा कोपनहेगन महापालिकेचा प्रयत्न असतो. कोपनहेगन रेल्वे स्थानकासमोरच मध्यवर्ती बस स्थानक आहे. तेथून शहराच्या सर्व भागांमध्ये जाण्याकरिता बसेस उपलब्ध असतात. मुंबई असो वा नवी दिल्ली, मध्यवर्ती स्थानकात किंवा बसेसचा मार्ग सुरू होतो तेथे किती वेळेत बस येणार याचा प्रवाशांना थांगपत्ता नसतो. प्रवाशांना जाऊ द्या, पण बस स्थानकाच्या नियंत्रकाकडे माहिती नसते. कोपनहेगन किंवा अन्य पाश्चात्त्य राष्ट्रांमधील बस सेवेत मात्र तशी माहिती प्राधान्याने दिली जाते. बस स्थानकावर बस किती वेळात येणार याची माहिती इलेट्रॉनिक बोर्डावर दिलेली असते. उदा. ६६ क्रमाकांची बस स्थानकावर किती वेळात येणार याची माहिती अचूक दिलेली असते. पाच मिनिटांत बस येणार ही माहिती फलकावर झळकत असल्यास तेवढय़ा वेळेत किंवा त्याच्या आधीच बस येणार हे निश्चित असते. यामुळे प्रवासीही निश्चिंत असतात.

दिलेल्या वेळेत बस आली नाही तर बसस्थानकावर असलेल्या क्रमांकावर दूरध्वनी करून बसबाबत विचारणा करता येते. आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक किंवी वीज कंपनीकडून दूरध्वनी क्रमांक दिला जातो. हा क्रमांक एक तर कायम ‘व्यस्त’ लागतो किंवा नुसती बेल वाजत राहते. कोपनहेगनमध्ये मात्र लगेचच दिलेल्या क्रमाकांवर दूरध्वनी लागतो. तेथे विचारणा केल्यावर लगेचच बस सध्या कुठे आहे आणि किती वेळ लागेल याची माहिती दिली जाते. काही वेळा नियंत्रण कक्षातून विचारणा करणाऱ्या प्रवाशाला उलटा दूरध्वनी केला जातो. काही ठरावीक वेळेपेक्षा जास्त वेळ बस येण्यास विलंब लागणार असल्यास टॅक्सीने जाण्याचा सल्ला नियंत्रण कक्षातून दिला जातो. कोपनहेगन शहरात टॅक्सी सेवा फारच महागडी आहे. पण बस उपलब्ध होत नसल्याने नियंत्रकाच्या सल्ल्यानुसार टॅक्सी केल्यास त्याचे भाडे बस कंपनीकडून वळते केले जाते. एवढी तत्परता कोपनहेगन सार्वजनिक बससेवेत आहे. आपल्या तुलनेत तेथील सार्वजनिक बस सेवा ही महागडी आहे. तीन ते चार थांब्यांच्या प्रवासाकरिता २० क्रोनपर्यंत (भारतीय रुपयांमध्ये २००रुपये) भाडे आकारले जाते. तुमच्याकडे बससेवेचे कार्ड असल्यास याच प्रवासाला १२ ते १५ क्रोनपर्यंत भाडे घेतले जाते. सकाळी आणि सायंकाळी कार्यालये सुटतात तेव्हा बस भरभरून जातात. बसमध्ये वाहक (कंडक्टर) नसतो. चालकाच्या समोरील भागात असलेल्या भागात कार्ड स्वाइप करायचे असते. वेळेच्या बाबतीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तत्पर असल्याने तुलनेत महागडी असली तरी कोपनहेगनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नागरिकांची पसंती मिळते.

लंडनच्या हिथ्रो किंवा बर्मिगहॅम विमानतळाच्या बाहेर आल्यावर तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसेस उभ्या असतात. डबल डेकर बसचा वापर केल्यास पाच गाडय़ांची वाहतूक टाळली जाईल, असे बसवर लिहिलेले असते. अलीकडेच बंगळुरू विमानतळाच्या बाहेर बंगळुरू महानगर प्राधिकरणाने ‘वायूवज्र’ ही व्होल्वोची वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. या बसेसमधून आरामदायी प्रवास करता येतो. उबर किंवा ओला टॅक्सी सेवेसाठी ८०० ते हजार रुपये पडतात त्याच मार्गावर ‘वायूवज्र’ या बससेवेकरिता २५० रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. बंगळुरूच्या कँपेगौडा विमानतळाच्या बाहेरच बस स्थानक असून, प्रत्येक मार्गावर जाण्यासाठी बसेस उपलब्ध असतात. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर आल्यावर आपले वाहन किंवा टॅक्सी कुठे मिळेल याबाबत नवखे प्रवासी नेहमीच गोंधळतात. टॅक्सी सेवा, खासगी वाहने पी ५ वा ६वर उभी केलेली असतात. पण तेथे जायचे कसे याचाच गोंधळ असतो. प्रवाशांनी नेमके कुठे व कसे जावे याचे मार्गदर्शन करणारे फलकही दिसत नाहीत.

अशीही समानता

कोपनहेगन आणि मुंबई शहरात सध्या एका बाबतीत समानता आहे. ती म्हणजे दोन्ही शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. कोपनहेगन शहराच्या मध्यवर्ती भागात सध्या सर्वत्र रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. मुंबईतही छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक वा चर्चगेटच्या जवळ सर्व रस्ते मेट्रोच्या कामाकरिता खोदून ठेवलेले आहेत. मुंबईत कुलाबा ते सिप्झ या मार्गावर भुयारी मेट्रो उभारण्याचे काम सुरू आहे. कोपनहेगन शहरातही भूयारी मेट्रो बांधण्याचे काम सुरू आहे. कोपनहेगन शहरात मेट्रो २००२ मध्ये सुरू झाली. आता या सेवेचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून वारंवार केले जाते. बेस्ट सेवा अधिक सक्षम झाली पाहिजे, असे मत मांडले जाते. बेस्ट सक्षम झाल्याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2018 2:21 am

Web Title: public transport in copenhagen denmark and in indian metro cities
Next Stories
1 ‘रिव्हर मार्च’ रॅलीला अमृता फडणवीस यांची उपस्थिती
2 रस्त्यावर गाडी पार्क केल्यास २ हजारांचा दंड, फोटो काढणाऱ्याला ५०० रुपये बक्षीस
3 मुंबई-दिल्ली प्रवास अवघ्या १० ते १२ तासात-नितीन गडकरी
Just Now!
X