सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजनेला खीळ

समीर कर्णुक, मुंबई</strong>

महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी रस्त्याला लागून ‘ई टॉयलेट’ बांधण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची कल्पना बासनात गुंडाळली गेली आहे. या कल्पनेची मुहूर्तमेढ म्हणून घाटकोपरमध्ये  काही वर्षांपूर्वी उभारलेले ‘ई टॉयलेट’ आजतागायत सुरू होऊ शकलेले नाही. आता तर या शौचालयातील सामान चोरटय़ांनी लंपास केले आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील शीव ते मुलुंड या प्रवासादरम्यान एकही सार्वजनिक शौचालय नव्हते. म्हणून या महामार्गावर प्रवाशांच्या सोयासीठी ‘ई टॉयलेट’ उभारण्याची महत्त्वाकांक्षी संकल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केली होती. त्यानुसार चार ते पाच लाख रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे स्टीलचे असे ‘ई टॉयलेट’ तयार करून घेतले. नाणे टाकून या शौचालयाचा वापर करायचा होता. तसेच हे शौचालय पूर्णपणे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण होते.

डिसेंबर २०१६ ला सार्वजनिक बांधकाम विभागाने हे ‘ई टॉयलेट’ घाटकोपर उड्डाणपूल येथील वाहतूक पोलीस ठाण्याचे समोर उभे केले. त्यानंतर मुलुंड ते शीव दरम्यान काही अंतरावर अशाच प्रकारचे ‘ई टॉयलेट’ उभे राहणार होते. मात्र अनेक महिने उलटूनही घाटकोपर येथील हे शौचालय सुरूच करण्यात आले नाही. विभागाचे देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने पुढे काही महिन्यांनंतर या ई टॉयलेटचे अनेक भाग चोरटय़ांनी चोरी केले. सध्या येथे केवळ स्टीलचा सांगाडा शिल्लक आहे. महत्त्वाचे म्हणजे या ई-टॉयलेटच्या समोरच वाहतूक पोलीस ठाणे आहे. त्यामुळे हा सांगाडा तरी शिल्लक राहिला आहे, असे येथील एका रहिवाशाने सांगितले.

लोकवस्तीपासून लांब असल्याने चोऱ्या

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याला विचारले असता, शहरातील काही भागात ही संकल्पना यशस्वी झाली. मात्र पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेले ‘ई टॉयलेट’ लोकवस्तीपासून लांब असतात. गर्दुल्ले आणि चोरटे त्यातले सामान चोरून नेत असल्याने ही ई-टॉयलेट चालविता येत नाहीत, असे त्यांनी सांगितले.