जम्मू-काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’कडून (FWICE) रविवारी मुंबईच्या फिल्मसिटीत जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच यापुढे बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना स्थान दिले जाणार नाही, त्यांची गाणीही भारतात रिलीज केली जाणार नाहीत, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच दोन तास संपूर्ण फिल्मसिटीचे काम थांबवून चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीशी जोडलेल्या सेलिब्रेटिंनी आज काळा दिवस पाळला.

FWICEचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी सांगितले की, शहीद झालेल्या सीआरपीएफच्या ४० जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कलाकारांऐवजी अनेक क्रिकेटपटू देखील आले होते. त्याचबरोबर यावेळी FWICE ने नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या तसेच पाकिस्तानी झेंडेही जाळण्यात आले.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जत्थ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे. या घटनेचा निषेध करताना सर्वांत आधी अक्षयकुमार, प्रियंका चोपडा, विकी कौशल, अनुपम खेर, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रेटिंनी आपली प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर देशभरातून शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीसाठी संपूर्ण देशभरातून लोक पुढे येत आहेत.