एल्गार परिषद प्रकरण आता मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात वर्ग करण्यास पुणे कोर्टाने मंजुरी दिली आहे. एनआयने या संदर्भातला अर्ज केला होता. त्यानुसार हा खटला मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात वर्ग करण्यात आला आहे. याआधी कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. त्यावरुन काही प्रमाणात टीकाही झाली होती. आता एल्गार परिषद प्रकरणाचा खटलाही एनआयएकडे वर्ग करण्यास पुणे हायकोर्टाने मंजुरी दिली आहे. मुंबई एनआयए कोर्टात सगळ्या आरोपींना २८ फेब्रुवारीला हजर केलं जाणार आहे.

 ७ फेब्रुवारीला काय झालं?

एल्गार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) हस्तांतरित करण्याचा निर्णय अद्याप सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे हा खटला एनआयए कोर्टाकडे देता येणार नाही,  असा युक्तिवाद ७ तारखेला सरकारी वकिलांनी पुणे जिल्हा न्यायालयात केला. ज्यानंतर  महाराष्ट्र राज्य आमच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने त्याचा तपास आम्ही करु शकतो, असे एनआयएच्या वकिलांनी सात तारखेलाच कोर्टात सांगितले. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर यावर १४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होईल असे न्यायाधीश नावंदर यांनी सांगितले होते.

त्यानुसार हे प्रकरण आज पुण्यातून मुंबईच्या एनआयए कोर्टात वर्ग करण्यास त्यांनी मंजुरी दिली. आज राज्य सरकारने हरकत दिली, मात्र ती दिली नसती तरीही हे प्रकरण मला एनआयएकडे सोपवावंच लागलं असतं असंही न्यायाधीश नावंदर यांनी सांगितलं

एनआयने एल्गार परिषद प्रकरणात नव्याने तपास सुरु करुन ३ फेब्रुवारीला कोर्टात एफआयआर दाखल केला. यामध्ये एकूण ११ जणांची नावं आहे. एल्गार परिषद प्रकरणी सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, वरवरा राव, सुधा भारतद्वाज, अरुण परेरा, व्हर्नन गोन्साल्विस, महेश राऊत हे सगळे तुरुंगात आहेत. नक्षलींशी संबंध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरुन या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे.