पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राबिवण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावास सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर राबिवण्यासाठी ‘पुणे महानगर मेट्रो रेल कार्पोरेशन’ची स्थापना करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. मात्र आता या मार्गाचा विस्तार करण्यात आला असून पहिला मार्ग पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट असा १६.५९ किमी लांबीचा असेल. हा मार्ग काही ठिकाणी उन्नत आणि भूयारी राहणार आहे. दुसरा मार्ग वनाझ ते रामवाडी असा १४.९२ किमी लांबीचा उन्नत मार्ग असेल. त्यांची किंमत ३ हजार २२३ कोटी रूपये असून दोन्ही प्रकल्पांचा २०२१ पर्यंत भांडवली खर्च १० हजार १८३ रूपये असेल. या प्रकल्पात दोन्ही महापालिकांचा वाटा प्रत्येकी १० टक्के, तर केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा प्रत्येकी २० टक्के असेल.