मुंबईपाठोपाठ पुणे हे गेल्या चार वर्षांपासून दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची माहिती असून इंडियन मुजाहिदीनचा  दहशतवादी कातिल सिद्दिकी याच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने घेतलेल्या जबानीतून या बाबीवर प्रकाश पडला आहे. मूळचा बीडचा असलेल्या कातिलने पुण्यातील कोंढवा या परिसरात इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवादी कारवाया कशा सुरू आहेत, याबाबतचा सविस्तर तपशील दिला आहे. भविष्यात पुण्यात मोठय़ा प्रमाणात घातपात करण्याचा इंडियन मुजाहिदीनचा डाव असल्याचेही त्यातून स्पष्ट होत आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पोलीस निरीक्षक मोनिया उप्पल यांनी २०११ मध्ये घेतलेल्या जबानीची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेचे बीडमधील दहशतवादी कारवायांवर लक्ष गेल्यानंतर पहिल्यांदा दोन दहशतवाद्यांना अटक झाली. सिद्दीकीने म्हटले आहे, अगदी २००६ च्या आधीपासून कोंढव्यात दहशतवादी कारवायांची बीजे रोवली गेली होती. कोंढव्यातील जामा मशीदमघ्ये शेख लालबाबा आणि त्याचा मित्र मस्तान हे जिहादवर चर्चा करीत असत. अबू खलिद तसेच बीडमधील फैय्याज कागझी यांच्या सांगण्यावरून जिहादचे धडे देण्याचे कामही आपण केले. लालबाबा ऊर्फ बडा बिलाल याला पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षणासाठी आपण तयार केले. त्यानंतर अबू खलिदच्या सांगण्यावरून सुरुवातीला त्याला कुवेतमध्ये नोकरी मिळवून दिली. कुवेतमध्ये त्याला अबू फाझल भेटला. त्यानंतर तो दुबईमार्गे पाकिस्तानात गेला. अशा अनेकांना याच मार्गाने पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. कोंढवा हे अशाच रितीने दहशतवादी कारवायांचे केंद्र बनले होते. भटकळ तसेच राज्याच्या विविध भागांतून तरुण या ठिकाणी येते होते.