अवघ्या सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करत, तिची हत्या करणाऱ्या नाजिल या आरोपीला उत्तर प्रदेशमधील रामपुरमध्ये पोलिसांनी अटक केली. रामपूरचे पोलिस अधीक्षक आणि एनकाउंटर स्पेशलिस्ट अजय पाल शर्मा यांनी नाजिलच्या दोन्ही पायांवर गोळ्या मारल्याने पोलिसांना त्याला पकडणे शक्य झाले. माध्यमांवर ही बातमी येताच अजय शर्मा यांच्या या धाडसी कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील शर्मा यांच्या कारवाईचे कौतुक करत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एका चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पकडताना पोलिस अधिक्षक (एसपी) अजय पाल शर्मा यांनी आरोपीला गोळ्या घातल्या. शर्मा यांनी केलेल्या या कठोर कारवाईमुळेच त्या नराधमाला अटक होऊ शकली! शर्मा यांचे करावे तितके कौतुक थोडेच. चिमुरड्या मुली तसंच महिलांवर बलात्कार करणारे पळून जाऊ नयेत म्हणून अशाच प्रकारे पोलिसांनी कारवाई करायला हवी.

महिलांवर अन्याय-अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याचा धाक उरलेला नाही. निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे कडक करण्यात आले असले तरी, महिलांवर अत्याचारांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे बलात्कार करणाऱ्यास ‘शरियत’ प्रमाणे फाशीची शिक्षा तत्काळ देण्यात यावी. महाराष्ट्रातही अशा बलात्काराच्या घटना घडत असतात. खरंतर, बलात्कार करणाऱ्या लिंगपिसाट नराधमांचे लिंगच कापण्याची तरतूद कायद्यात करायला हवी. कायद्याची दहशत असेल तर आणि तरच महिलांसाठी सुरक्षित वातावरण आपल्याला या देशात निर्माण करता येईल. असही त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटल आहे.