21 September 2020

News Flash

७६७८ जणांना धुळवडीला धक्का

बुधवारी रात्री १२ ते गुरुवारी संध्याकाळी चारपर्यंत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ७६७८जणांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा धक्का बसला.

(संग्रहित छायाचित्र)

५४७ तळीराम चालकांना दंड

स्थानिक पोलीस, वाहतूक पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे गुरुवारी मुंबईत अप्रिय घटनेचे गालबोट न लागता धुळवड उत्साहात साजरी झाली. बुधवारी रात्री १२ ते गुरुवारी संध्याकाळी चारपर्यंत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ७६७८जणांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा धक्का बसला. त्यात मद्याच्या नशेत वाहन चालवणाऱ्या ५४७ तर विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ३९१९ जणांचा समावेश होता.

मद्याच्या नशेत होळी, रंगपंचमी साजरी करण्याचे प्रकार शहरात सर्वत्रच घडतात. बुधवारी दिवसभर विशेषत: संध्याकाळी शहरातील सर्वच वाइन शॉपबाहेर ग्राहकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावून वाहनचालकांची तपासणी सुरू केली. स्थानिक पोलिसांनी आपापल्या हद्दीतील संवेदनशील स्थळे, मिश्र वस्त्या, अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे आणि गुन्हे किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवलेल्या ठिकाणांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

गेल्या आठवडय़ात पोलीस आयुक्तालयाने एखाद्यावर त्याच्या इच्छेविरोधात रंगांची उधळण करणाऱ्या, रंगमिश्रित पाण्याचे फुगे भिरकावणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी आपापल्या हद्दीतली गस्त वाढवली होती. या उपाययोजनांमुळे शहरात कोठेही, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. इच्छेविरोधात रंगांची उधळण किंवा फुगे भिरकावल्याबद्दल गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहरातल्या एकाही पोलीस ठाण्यात तक्रार आली नव्हती, असे पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले. ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार गुन्हा किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतील अशा असंख्य अतिउत्साहींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात आणून त्यांना समज देऊन सोडण्यात आले.

वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार होळी, रंगपंचमी साजरी करताना वाहतुकीचे नियम मोडले जातात.

त्यामुळे अपघात होऊन मनुष्यहानीची शक्यता असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन मध्यरात्री १२ पासून शहरातली नेमकी ठिकाणे निवडून नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्था राखली गेली.

धुळवड  साजरी  पण  संयमाने

गेल्या काही वर्षांत सणांचा उत्साह मावळल्याचे धुळवडीच्या निमित्ताने पुन्हा दिसून आले. यंदा आधीच पाणी कपात असल्यामुळे अनेकांनी पाण्याचा अपव्यय टाळला, तर फुगे मागणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी आधीच दिल्यामुळे फुगे मारणाऱ्यांचे प्रमाणही खूप कमी झाल्याचे दिसले. ज्यांनी धुळवड साजरी करायची नाही त्यांच्या मताचा आदर राखण्याचे भान अनेक ठिकाणी पाळले गेल्याचे दिसले. काही जणांनी बाहेरगावी जाऊन सहल साजरी करण्याची संधीही साधली.

मुंबई-अथक सेवा संघातर्फे साकीनाक्यात आगळीवेगळी होळी साजरी करण्यात आली. होलिकादहनात आरोग्यासाठी घातक असलेले तंबाखू, सिगारेट, विडी आणि गुटख्याचे दहन करून सामाजिक संदेश देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 1:02 am

Web Title: pushing 7678 people to holi
Next Stories
1 खोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’
2 मुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे!
3 ध्वनिप्रदूषणाबाबतचे प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यास पुन्हा नकार
Just Now!
X