निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा वापर बंद होणार नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. राज यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. ईव्हीएम मशीन्समध्ये गडबड आहे हे आपण खूप आधीपासून ऐकत आहोत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याची कुजबुज सुरु झाली. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत या दाव्याला पुष्टी मिळत गेली. असंख्य मतदारसंघांमध्ये तुमच्या माझ्या पक्षाच्या नगरसेवक, आमदारांनी चांगली कामगिरी करुन देखील पराभव झाला. काही ठिकाणी उमेदवारांना शून्य मत मिळाली हे न पटणार आहे असं राज यांनी पत्रात म्हटलं आहे.
२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान ईव्हीएम मशीन हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अशा पद्धतीने निवडणुका होणार असतील तर निवडणुका का घ्यायच्या ? असा सवाल त्यांनी केला आहे. लोकशाहीत मतदार हाच अंतिमत: राजा असतो पण याच तत्वाला हरताळ फासण्याचे काम मागची ३ ते ४ वर्ष सुरु आहे असे राज यांनी म्हटले आहे.
हा विषय गंभीर आहे. जो पर्यंत निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट मशिन्स किंवा मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करुन देत नाही तो पर्यंत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालावा असं आवाहन राज यांनी पत्राद्वारे देशातील राजकीय पक्षांना केलं आहे.
राज यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं. या पत्रात राज यांनी ईव्हीएमवर बंदी आणूया, किंवा निवडणुकांवर बहिष्कार घालूया असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी पत्रात मनसेच्या मागणीला शिवसेनेने पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच ईव्हीएमच्या मुद्द्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. भाजपा वगळता जवळपास सर्वच पक्षांनी ईव्हीएम प्रक्रियेला विरोध केला असून, मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. दिल्लीत पार पडलेल्या या बैठकीत याच मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीला शिवसेना आणि मनसेचे प्रतीनिधीही उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 12:30 am