महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथून सनातनचा साधक वैभव राऊतला अटक केली असून त्याच्या घरात बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्यही सापडले आहे. यावरुन सनातन संस्था दहशतवादी कारवाई करत आहे हे स्पष्ट होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

आज महाराष्ट्र एटीएसने नालासोपारामधून सनातन संस्थेच्या साधकाला बॉम्ब आणि बॉम्बच्या साहित्यासहित अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या सरकारने या सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी वारंवार मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

या सनातन संस्थेला गोवा आणि महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय मिळत आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. या सनातन संस्थेला अजून किती लोकांची हत्या करायची आहे आणि त्यांचा आणखी कोणता कट आहे याची माहिती घ्यावी आणि सरकारने हा विषय गंभीरतेने घेवून तात्काळ या संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

वैभव राऊत एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता – वकिलांचा दावा
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धाड टाकून अटक केलेला वैभव राऊत हा सनातनचा साधक नसून एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे असा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. यासोबतच वैभव राऊत याने असं काही केलं असावं असं मला वाटत नाही. त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही. त्याला लागेल ती सर्व मदत करु असं सांगताना पोलिसांवर आणि गृहखात्यावर आमचा विश्वास नाही. गृहमंत्री जाणूनबुजून हे घडवत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. सनातनच्या कार्यकर्त्यांना वारंवार त्रास दिला जातो तसंच मुख्यमंत्री वारंवर संस्थेला बदनाम करत आहेत असंही ते म्हणाले आहे.