मुंबई आणि महानगर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या जवळपास सव्वा लाख जागा रिक्त असून या जागांवरील प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश फेरी सुरू करण्यात आली आहे.

अकरावीच्या नियमित तीन प्रवेश फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या अशा एकूण पाच फेऱ्यांनंतर मुंबई आणि परिसरातील महाविद्यालयांमध्ये एक लाख ९६ हजार १३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एकूण तीन लाख २० हजार ३९० जागा उपलब्ध होत्या. एकूण पाच फेऱ्यांनंतरही रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश फेरी होणार आहे. या फेरीसाठी मुंबई आणि महानगर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या एक लाख २४ हजार २५४ जागा उपलब्ध आहेत. बुधवारपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार नऊ टप्प्यांत या फेरीतील प्रवेश करण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, अर्ज न केलेले विद्यार्थी किंवा प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेले, मिळालेले प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतील.

अकरावीला प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असणार आहे. जानेवारी अखेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

प्रवेश प्रक्रिया कशी?

* १३ ते १५ जानेवारी – ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी

* १६ ते १८ जानेवारी – ८० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी

* १९ आणि २० जानेवारी – ७० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी

* २१ आणि २२ जानेवारी – ६० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी

* २३ ते २५ जानेवारी – ५० ते १०० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी

* २७ आणि २८ जानेवारी – दहावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी

* २९ आणि ३० जानेवारी – एटीकेटी मिळालेले विद्यार्थी

प्रवेश आणि रिक्त जागांची स्थिती

शाखा   उपलब्ध जागा   प्रवेश   रिक्त जागा

कला   ३७ हजार ३००   १९ हजार ३४६   १७ हजार ९५४

वाणिज्य    १ लाख ७३ हजार ५२०   १ लाख ११ हजार २११   ६२ हजार ३०९

विज्ञान १ लाख ३ हजार ९१०    ६३ हजार ३००   ४० हजार ६१०

एचएसव्हीसी    ५ हजार ६६०    २ हजार २७९ ३ हजार ३८१

एकूण   ३ लाख २० हजार ३९०   १ लाख ९६ हजार १३६   १,२४,२५४