अभिजात संगीताच्या क्षेत्रातील नव्या दमाच्या दमदार कलावंतांसाठी स्वरमंच उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने आयोजिलेल्या ‘शागीर्द’ या उपक्रमाचे रसिक भरभरून स्वागत करीत आहेत. पंडिता श्रीमती किशोरीताई आमोणकर आणि पंडित शिवकुमार शर्मा यांसारख्या दिग्गजांच्या आशीर्वादाने आणि उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाविषयी रसिकांना कमालीचे औत्सुक्य आहे.
भारतीय अभिजात संगीताचा वारसा समर्थपणे पुढे चालविण्यासाठी नव्या पिढीच्या दोन कलाकारांचे आश्वासक पाऊल ‘शागीर्द’च्या निमित्ताने स्वरमंचावर पडणार आहे. गानसरस्वती श्रीमती किशोरीताई आमोणकर यांच्या शिष्या तेजश्री आमोणकर आणि जगविख्यात संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई या दोघांची यासाठीची निवड गुरूंचा विश्वास सार्थ ठरविणारी असेल, अशी भावना रसिक बाळगून आहेत. बुधवार, २२ जुलै रोजी दादर येथील शिवाजी मंदिर येथे होणाऱ्या, पृथ्वी एडिफिस प्रस्तुत कार्यक्रमात हे दोघे शागीर्द आपल्या गुरुवर्याच्या उपस्थितीत कला सादर करणार आहेत. २५ जुलै रोजी हा कार्यक्रम ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. दोन्ही दिवशी हा कार्यक्रम सायंकाळी पावणेसात वाजता सुरू होईल.