सुरक्षा मानकांच्या फेरआढाव्याची तज्ज्ञांची सूचना

मुंबई : मुंबईत बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे गिरगाव चौपाटीपलीकडील विल्सन कॉलेजच्या रस्त्यापर्यंत समुद्र आणि पावसाचे पाणी साचले. त्यामुळे दक्षिण मुंबई व उपनगरांना जोडण्यासाठी मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या किनारपट्टी रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकल्पाचे काम नुकतेच सुरू झालेले असल्याने बुधवारी निसर्गाने दिलेला इशारा लक्षात घेऊन वेळीच प्रकल्पाच्या सुरक्षा मानकांचा फे रआढावा घेऊन आवश्यकतेनुसार सुधारणा कराव्यात, अशी मागणी तज्ज्ञांनी केली आहे.

दक्षिण मुंबईतील ‘शामलदास गांधी मार्ग’ (प्रिन्सेस स्ट्रीट) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’ (वांद्रे-वरळी सागरी सेतू) यांना जोडणाऱ्या या किनारपट्टी रस्त्याची लांबी ९.९८ कि.मी. असून त्यासाठी सुमारे १२ हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना आवश्यकतेनुसार मार्ग बदलता यावा किंवा बाहेर पडता यावे यासाठी या रस्त्यावर अमर सन्स उद्यान, हाजीअली व ‘वरळी सी फेस’ या तीन ठिकाणी आंतरबदल सुविधा असणार आहेत. या ‘आंतरबदल’ सुविधांमध्ये एकूण १८ मार्गबदल पर्याय असून यापैकी ९ पर्याय किनारपट्टी रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी, तर ९ पर्याय हे या रस्त्यावरून बाहेर पडण्यासाठी आहेत.

हाजी अली येथील आंतरबदल त्रिस्तरीय असेल व त्याची जमिनीपासून कमाल उंची २४ मीटर असणार आहे. तर ‘वरळी सी फेस’ येथील दोन स्तरीय आंतरबदलांची जास्तीतजास्त उंची ही ११.३ मीटर, तर अमर सन्स उद्यान येथील एक स्तरीय आंतरबदलाची कमाल उंची ११.४ मीटर असणार आहे. या प्रकल्पासाठी ९६ लाख ८७ हजार ५१० चौरस फुटांचे भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी सुमारे २२ टक्के क्षेत्रात म्हणजेच २१ लाख ५२ हजार ७८० चौरस फुटांमध्ये किनारपट्टी रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित ७८ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत.

मुंबईत बुधवारी झालेला पाऊस हा अभूतपूर्व होता. कधी नव्हे ते दक्षिण मुंबईतही पाणी साठले. समुद्राची पातळी वाढली. किनारपट्टी रस्ता प्रकल्पाचा व या पुराचा संबंध नाही हे स्पष्टच आहे. मात्र, या पुरामुळे किनारपट्टी रस्ता प्रकल्पाच्या भविष्यातील सुरक्षिततेबाबत मुंबईकरांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

हवामान बदलामुळे भविष्यात कधीही, कुठेही, कितीही वेळा अशा प्रकारचे संकट येऊ शकते. त्यामुळे सुरक्षा मानकांचा फे रआढावा तातडीने घ्यायला हवा. अन्यथा हजारो कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची सुरक्षितता भविष्यात अशा संकटांमुळे धोक्यात येऊ शकते, असे वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी सांगितले.

तज्ज्ञांचा सल्ला..

’ सरासरी पाऊस-पुरस्थिती आणि त्यापेक्षा अधिक पाऊस लक्षात घेऊन अशा प्रकारच्या प्रकल्पांची आखणी केली जाते. पण बुधवारचा दक्षिण मुंबईतील पाऊस हा जवळपास पाणी निचरा व्यवस्थेपेक्षा सहापट होता. हवामान बदलामुळे भविष्यात असा पाऊस पडून संकट येऊ शकते.

’  मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. किनारपट्टी रस्त्याची उंची, पाणी वाहून जाण्याची व्यवस्था आदी सुरक्षा मानकांचा विचार करावा लागेल.

’ त्यामुळे याबाबतचा फे रआढावा घेऊन वेळीच सुधारणा करण्यास वाव आहे. सुधारणा करण्याची गरज पडली तरी आता खर्च थोडाफार वाढेल पण आकस्मिक संकटाला तोंड देणारा व दीर्घकाळ उपयोगात येईल असा प्रकल्प तयार होईल, असे नगरनियोजन तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी नमूद केले.