मुंबई : अभियांत्रिकी महाविद्यालयांनंतर आता औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला असून वेतन थकविल्याच्या तक्रारी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे येत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे एकीकडे नव्या महाविद्यालयांना परवानगी देण्यात येत असताना दुसरीकडे खर्च भागत नसल्याचे कारण देत संस्थांकडून सध्या असलेल्या महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचा पगार थकवण्याचे प्रकार घडत आहेत. वेतन थकवल्याच्या तक्रारी असणाऱ्या महाविद्यालयांनाही परिषदेकडून नव्या महविद्यालयांसाठी परवानगी देण्यात आली आहे.

राज्यातील तंत्रशिक्षणाचा कल सध्या अभियांत्रिकीकडून औषधनिर्माणशास्त्राकडे वळला आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे राज्यात नव्याने ४२ महाविद्यालयांना परवानगी दिली आहे. मात्र, त्याच वेळी सध्या असलेल्या महाविद्यालयांमध्ये वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी प्राध्यापकांकडून करण्यात येत आहेत. वेतनाचा प्रश्न असलेल्या अनेक संस्थांनी तुकडीवाढ करण्यासाठी पदविका अभ्यासक्रम सुरू असताना पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज केले आहेत. वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतील अधिकाऱ्यांनीही सांगितले. पुरेसे विद्यार्थी नाहीत, समाजकल्याण विभागाकडून शुल्काची रक्कम देण्यात आलेली नाही, अशी कारणे संस्थांकडून देण्यात येत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. गेल्या वर्षी राज्यात औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या दोनशे ते अडीचशे जागाच रिक्त होत्या. हे प्रमाण एकूण जागांच्या दहा ते वीस टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर संस्थेवर कर्ज असल्याचे कारण देत अभियांत्रिकी महाविद्यालयांचे वेतन थकवणाऱ्या संस्थांनीही नवी महाविद्यालये सुरू करण्याचा घाट घातला आहे. वेतन थकवणाऱ्या, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाहनिधीचा अपहार करणाऱ्या संस्थांनाही परिषदेकडून नव्या महाविद्यालयांसाठी परवानगी देण्यात आली आहे.