23 September 2020

News Flash

रुग्णालये बेपर्वा, अग्निशमन निर्धास्त

अग्निशमन दलाने रुग्णालयांतील तपासणीची मोहीम २०१५-१७ या काळातही राबविली.

कामगार रुग्णालयातील सुविधांच्या कमतरतेनिषेधार्थ येथील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी निदर्शने केली.

अडीचशे रुग्णालयांची तपासणी, मात्र उपाययोजनांची पडताळणीच नाही

प्रसाद रावकर, मुंबई

अंधेरीतील राज्य कामगार विमा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेनंतर मुंबईतील सर्वच रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या चार वर्षांमध्ये मुंबईमधील केवळ २५ मोठी सरकारी आणि खासगी रुग्णालये तसेच २०४ सरकारी दवाखान्यांमधील अग्निशमन यंत्रणेची अग्निशमन दलाने तपासणी केली आहे. मात्र या रुग्णालयांनी अग्निसुरक्षेची यंत्रणा बसवली आहे की नाही, याची पडताळणीच झालेली नाही, तर रुग्णालय व्यवस्थापनांनीही अग्निशमन दलाला ते कळविण्याची तसदी घेतलेली नाही.

कोलकाता येथील रुग्णालयाला २०११ मध्ये भीषण आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने मुंबईतील १०० पेक्षा अधिक खाटा असलेल्या रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत ६७ रुग्णालयांमध्ये पाहणी करण्यात आली. रुग्णालयांतील अग्निशमन यंत्रणेत आढळलेल्या त्रुटींविषयी अग्निशमन दलाने रुग्णालय व्यवस्थापनाला काही शिफारसी केल्या. या शिफारसींची ६७ पैकी ६६ रुग्णालयांनी अंमलबजावणी केली. मात्र एका रुग्णालयाने शिफारशींना वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. त्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.

अग्निशमन दलाने रुग्णालयांतील तपासणीची मोहीम २०१५-१७ या काळातही राबविली. या तीन वर्षांत २० रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणेची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान यंत्रणेत त्रुटी आढळलेल्या
चार रुग्णालयांवर नोटीस बजावण्यात आली. हाती नोटीस पडताच या रुग्णालयांनी अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी दूर केल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

अग्निशमन दलाने २०१८ मध्ये पाच मोठी सरकारी आणि २०४ सरकारी दवाखान्यांमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली. उपचारासाठी येणारे तसेच, दाखल असलेले रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा कशी असावी याबाबत अग्निशमन दलाने काही शिफारशी रुग्णालय व्यवस्थापन आणि दवाखान्यांच्या प्रशासनाला केल्या होत्या. मात्र या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली आहे की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

पडताळणी यंत्रणेचा अभाव

रुग्णालय, शाळा अथवा उंच इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेची पाहणी केल्यानंतर त्यातील त्रुटी सुधारण्याची शिफारस अग्निशमन दलाकडून संबंधितांना करण्यात येते. मात्र संबंधितांनी अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी दूर केल्या की नाही हे पडताळून पाहण्याची यंत्रणा अग्निशमन दलाकडे नाही. अग्निशमन दलामध्ये सुमारे दोन हजार ८०० इतकेच मनुष्यबळ असून इमारतींची तपासणी करणे, दैनंदिन कामात दलातील मनुष्यबळ व्यस्त असते. मुंबईचा पसारा लक्षात घेता पाहणी केल्यानंतर पुन्हा पडताळणी करणे मनुष्यबळाअभावी दलाला शक्य नाही, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

रुग्णालयांमध्ये आगीच्या ६० घटना

गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबईतील रुग्णालयांमध्ये छोटय़ा-मोठय़ा ६० आगीच्या घटना घडल्याची नोंद अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे नोंद झाली आहे. यापैकी काही घटना केवळ सदोष अग्निशमन यंत्रणेमुळे घडल्याचे उजेडात आले आहे. मात्र तरीही यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 3:06 am

Web Title: question over fire safety issue for all hospitals in mumbai
Next Stories
1 आगीतून फुफाटय़ात!
2 सामान्यांना गंडा घालण्यासाठी ‘गुगल’चा गैरवापर
3 मुंबईची कूळकथा : मुंबईतील मध्ययुगीन लेण्यांचा शोध
Just Now!
X