गेल्या २७ दिवसांपासून मराठा समाजाच्या तरुणांनी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे, मात्र या तरुणांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरले. सरकारची ही उदासीनता आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांना न्याय देण्यासाठी सरकारला विधिमंडळात भाग पाडू अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांना दिले.

आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजाच्या तरुणांची आज फडणवीस, दरेकर व नीतेश राणे यांनी भेट घेतली. दरेकर यांनी मराठा समाजाच्या तरुणांच्या आंदोलनाच्या मागील भूमिका फडणवीस यांना समजावून सांगितली. २७ दिवस होऊनही अद्यापही सरकारला या विषयाचे गांभीर्य नसल्याची टीका दरेकर यांनी केली. त्यावर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळाने एकमताने संमत केला होता. न्यायालयाने अद्यापही हा कायदा अमान्य केलेला नाही. त्यामुळे या कायद्यातील तरतुदीनुसार उपोषणाला बसलेल्या उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी विधिमंडळात सरकारला जाब विचारू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.