‘शो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राज कपूर आणि संपूर्ण कपूर कुटुंबियांनी या कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. अशा या कुटुंबाची एक परंपराच जणू या कलाविश्वात सुरु आहे. याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आर.के. स्टुडिओ. हिंदी चित्रपट जगतामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या आणि चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिलेल्या या स्टुडिओची स्थापना राज कपूर यांनी केली होती. हे जणू त्यांच्यासाठी आणि कपूर कुटुंबियांसाठी दुसरं घरच होतं. पण, आता मात्र ही वास्तू इतिहासजमा होणार असल्याचं दिसत आहे. कारण, हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खुद्द ऋषी कपूर यांनीच याविषयीची माहिती दिली. आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर या वास्तूचं आणि त्यात संग्रहीत केलेल्या आठवणींचंही नुकसान झालं. त्यामुळे आता हा स्टुडिओ विकणं योग्य ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं. हा निर्णय तितका सोपा नव्हता. पण, कुटुंबियांशी चर्चा करुन एकमतानेच ते या निर्णयावर पोहोचल्याचं कळत आहे. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर, मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव आणि मुलगी रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकमताने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे. स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न तुलनेने कमी असून त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्चच जास्त असल्यामुळे ते या निर्णयावर पोहोचले आहेत. स्टुडिओला आग लागण्यापूर्वीपासूनच प्रचंड नुकसानाचा सामना करावा लागल्याचं म्हणत हा पांढरा आणि अवाढव्य हत्ती सांभाळण्यासाठी अडचणी येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

वाचा : काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट

कपूर कुटुंबाच्या वतीने ऋषी कपूर यांनी ‘मुंबई मिरर’शी संवाद साधत याविषीची माहिती दिली. काळजावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता आर.के. बॅनर्स, आणि त्याच्या आठवणी कालबाह्य होण्याच्या मार्गावर असल्याचीच प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.